Pune : फॉरेक्स एजंटकडून अमेरिकन डॉलरची जबरी चोरी करणा-या आरोपीला हैदराबाद येथून अटक

गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी

एमपीसी न्यूज – फॉरेक्स कार्यालयाला फोन करून अमेरिकन डॉलरची मागणी करून आलेल्या एजंटकडून जबरदस्तीने अमेरिकन डॉलरची चोरी करणा-या आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

राहुल किरण गाटीया (वय 31, नेपीयन रोड, वाळकेश्वर मुंबई), असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात कोरेगाव पार्क येथे अमेरिकन डॉलर पाहिजे असे सांगून फॉरेक्स कर्मचा-याला बोलावून घेऊन नंतर त्याच्याकडून जबरदस्तीने ते डॉलर चोरून नेले होते. या प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी महेंद्र जगताप याचा तपास करीत होते.

तपास सुरू असताना हैदराबाद येथे अशाच प्रकारची घटना घडल्याचे समजले. त्यामुळे या घटनांमधील आरोपी एकच असू शकतो यासाठी युनिट दोनच्या पोलिसांनी तातडीने हैदराबाद पोलिसांशी संपर्क साधून गुन्ह्याची कार्यप्रणाली जाणून घेतली.  आरोपी हा आधी बनावट नावाने सर्व्हिस अपार्टमेंट बुक करतो. नंतर फॉरेक्स सर्व्हिस देणा-या कार्यालयांना फोन करून अमेरिकन डॉलर हवे असल्याची मागणी करून त्यांना डिलिवरीसाठी अपार्टमेंटमध्ये बोलवतो. एजंट डॉलर घेऊन आले असता त्याच्या चेह-यावर स्प्रे मारून जबरदस्तीने डॉलर चोरून फरार होत असे. तपासाअंती पुणे आणि हैदराबाद मधील आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हैदराबाद आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणच्या फॉरेक्स सर्विसेस देणा-या कार्यालयांना याबाबत पोलिसांनी माहिती देऊन ठेवली. तसेच अशा प्रकारची फोनवरून मागणी केली असता ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधण्याबाबत सांगितले.

त्याप्रमाणे हैदराबादमध्ये एका फॉरेक्स कार्यालयाला कॉल करून सात हजार डॉलरची मागणी आरोपीने केली होती. याची माहिती त्यांनी तात्काळ हैदराबाद पोलिसांना कळविली. माहिती मिळताच हैदराबाद पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली.

अटक केलेल्या आरोपीला कोरेगाव पार्क येथील गुन्ह्यात वर्ग करून पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट दोनच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी राहुल याने पुण्यात अशा प्रकारचे दोन गुन्हे केले असून चोरलेले अमेरिकन डॉलर त्याने मुंबई येथील फॉरेक्स एक्सचेंज येथून 12 हजार अमेरिकन डॉलर बदलून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली.

ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उप निरीक्षक प्रतापसिंह शेळके आदी पोलीस कर्मचा-यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.