Wakad : कारमध्ये विसरलेले दीड लाखांचे दागिने अवघ्या काही तासात परत

वाकड पोलिसांची तत्पर कामगिरी

एमपीसी न्यूज – मुंबईहून पुण्याला प्रवासी कारमधून आलेल्या महिलेचे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कारमध्ये विसरले. याबाबत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद देताच, अवघ्या काही तासात वाकड पोलिसांनी महिलेला तिचे दागिने मिळवून दिले. नुकतेच वाकड पोलिसांनी मोबाईल हिसकावून पळून जात असलेल्या चोरट्याला पकडले होते. त्यानंतर लगेच ही कामगिरी केल्याने वाकड पोलिसांची तत्परता आणि कामाचे गांभीर्य असल्याचे दिसून येत आहे.

शीतल संभाजी सूर्यवंशी (वय 26, रा. कोपरखैरने, नवी मुंबई) यांनी याप्रकरणी वाकड पोलिसात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल मुंबईहून पुनावळे येथील हॉटेल ताज येथे खाजगी प्रवासी कारने आल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांची एक कपड्याची बॅग कारमध्ये विसरली. त्या बॅगमध्ये 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळे सोन्याचे दागिने होते. याबाबत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार देत असताना महिलेजवळ कारचा नंबर किंवा त्याचे वर्णन अशी कोणतीही माहिती नव्हती. या प्रकारची गांभीर्याने दखल घेत वाकड पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्वक तपास करत मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणा-या वाहनांची माहिती संकलित करून संबंधित कारची माहिती काढून शिवाजीनगर येथून सोने असलेली बॅग मिळवली.

सुखरूप बॅग मिळाल्याने शीतल यांनी पोलिसांना दहा हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. ही बक्षिसाची रक्कम देखील वाकड पोलिसांनी आदराने नाकारली. ही कारवाई सहाय्यक पोलीस फौजदार भालेराव, पोलीस हवालदार बंडू हजारे, पोलीस शिपाई गिलबिले, इंगळे, यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.