Chinchwad News : माय-लेकाच्या दुहेरी खूनाच्या तपासासाठी चार पथकांची निर्मिती

लग्नासाठी धर्मांतर, घरमालकावर कारवाई आणि बरंच काही

एमपीसी न्यूज – सावत्र बापाने चार वर्षांचा मुलगा आणि पत्नीचा खून केल्याची घटना शनिवारी (दि. 9) वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उघडकीस आली. या दुहेरी खूनाच्या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान या प्रकरणात अनेक रंजक बाबींचा उलगडा होत आहे.

मयत महिलेने विवाहासाठी धर्मांतर केले असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच मयत महिला भाड्याच्या खोलीत राहत होती, त्याबाबत भाडेकरुची माहिती पोलिसांना न दिल्याने घरमालकावरही कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सुमैय्या नासीर शेख (वय 41), आयान (वय 4, दोघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी खून झालेल्या माय-लेकाची नावे आहेत. नोमान ऊर्फ सोमेश्‍वर काळे (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत सुमैय्या यांच्या मुलीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई 6 जानेवारी रोजी आरोपी पती काळे याच्याकडे गेली. त्यानंतर तिचा संपर्क झाला नाही. आरोपी हा फिर्यादी महिलेचा सावत्र बाप आहे. आरोपी बाप फिर्यादी यांच्या मयत सावत्र भाऊ आयान याला घरातून घेऊन गेला. तसेच आरोपी आपल्या सावत्र मुलीवर (फिर्यादी) वाईट नजर होती. त्यामुळे सुमैय्या यांनी आरोपीला घरात राहू दिले नाही. या कारणावरून त्याने फिर्यादी यांची आई सुमय्या आणि भाऊ आयान यांच्यावर हत्याराने वार करून निर्घृणपणे खून केला.

सुमैय्या आणि आयान या दोघांवर आरोपी काळे याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आले. त्यानंतर आरोपी काळे हा फरार झाला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने हा खून दोन-तीन दिवसांपूर्वी झाल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखा युनिट दोनचे एक पथक खोली भाड्याने घेणारा तरुण शंकर वाकडे याच्या गावी लातूर येथे गेले. मात्र तो दोन महिन्यांपासून गावीच असल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांची उर्वरित तीन पथके शहरात आरोपीचा शोध घेत आहेत.

आरोपीचा मित्र शंकर कराडे याला आपण 15 डिसेंबर रोजी खोली भाड्याने दिली असल्याची खोटी माहिती घरमालकाने पोलिसांना दिली. मात्र शंकर कराडे हा नोव्हेंबर पासून गावी आहे. म्हणजे त्याने नोव्हेंबर पूर्वीच खोली भाड्याने घेतल्याचे उघडकीस आले. घरमालकाने पोलिसांना खोटी माहिती दिली तसेच भाडेकरूची माहिती घेतली नाही व ती माहिती पोलिसांना दिली नाही. यामुळे घरमालकावरही कारवाई करणार असल्याचे चिंचवड पोलिसांनी सांगितले.

मयत सुमैय्या हिने नासिर याच्याशी विवाह करण्याकरिता मुस्लिम धर्म स्विकारला. त्यानंतर नासिर याचा मृत्यू झाला. पाच वर्षापूर्वी सुमैय्या हिने काळे याच्याशी विवाह केला. यामुळे काळे यानेही मुस्लिम धर्म स्विकारला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.