Pimpri : माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांचा शिवसेनेत प्रवेश  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी आज (शुक्रवारी) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

पिंपरीतील शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बहिरवाडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद उपस्थित होते.

प्रा. रामकृष्ण मोरे यांचे बहिरवाडे खंदे समर्थक होते. 1997 साली पहिल्यांदा ते चिंचवड स्टेशन प्रभागातून  नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2002 मध्ये झालेल्या तीन सदस्यीय निवडणुकीत ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या पॅनलचा बहिरवाडे यांनी दारुण पराभव केला होता. ऐतिहासिक निवडणूक झाली होती. खासदार श्रीरंग बारणे यांच्या गाजलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची संपूर्ण व्यूहरचना बहिरवाडे यांनी आखली होती. काँग्रेसचे बहुमत नसताना बारणे यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आणले होते.

बहिरवाडे 2008 साली रुपी-को-बँकेचे संचालक म्हणून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले होते. 2012 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शाहूनगर, संभाजीनगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरसेवकपदाच्या 20 वर्षाच्या काळात अनेक विकासकामे केली.

शाहूनगरमध्ये राजर्षी शाहू उद्यान केले. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. शाहूनगरमध्ये कै.सदाशिव बहिरवाडे क्रींडागण व व्यायमशाळा सुरु केली. शिव-शाहू संभाजी, बर्ड व्हॅली उद्यान केले. मॉडेल वॉर्ड अंतर्गत अनेक विकास कामे बहिरवाडे यांनी केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.