Pimpri: ‘अर्थसंकल्पाच्या 25 टक्के रक्कम पर्यावरण प्रदुषण टाळण्यासाठी ठेवा’

माजी खासदार गजानन बाबर यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पाच्या 25 टक्के रक्कम ही पर्यावरण, प्रदुषण आणि सांडपाणी, नदीप्रदुषण टाळण्यासाठी ठेवण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत गजानन बाबर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने 8 एप्रिल 2016 रोजी नागरी घनकचरा व्यवस्थापनाबाबत सुधारीत अधिसुचना जारी केली आहे. त्यामध्ये नगरपालिका, महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांची कर्तव्ये आणि जबाबदारी निश्चित केली आहे.

या नियमानुसार, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्या कार्यक्षेत्रात होणा-या नागरी घनकच-याचे योग्य पद्धतीने संकलन करावे. त्यामध्ये वर्गवारी, विगतवारी, वाहतुक, प्रक्रीया व विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करणे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आहे. पर्यावरणाचे प्रदुषण होणार नाही याची काळजी घेणेही आवश्यक आहे.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रातून निर्माण होणारा नागरी घनकचरा व घरगुती सांडपाणी यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एकूण वार्षिक अर्थसंकल्प रकमेच्या 25 टक्के निधी राखीव ठेवण्याचे आदेश वेळोवेळी दिले होते.

त्याअनुषंगाने मंडळाच्या संमती पत्रातील अटी व शर्तीप्रमाणे घनकचरा व सांडपाणी यांचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या चालू 2020-21 च्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पाच्या 25 टक्के रक्कम ही पर्यावरण, प्रदुषण आणि सांडपाणी, नदीप्रदुषण टाळण्यासाठी ठेवण्यात यावी, असे बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like