Pune News : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात निधन

एमपीसी न्यूज : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत (वय 91 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने आज (सोमवारी दि.15 फेब्रुवारी) सकाळी 9 च्या सुमारास बाणेर येथील राहत्या घरी निधन झाले.

पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. उद्या (मंगळवार दि. 16 फेब्रुवारी) सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सावंत यांची अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला.

बॉम्बे युनिव्हर्सिटीतून सावंत यांनी एलएलबीचे उच्चशिक्षण घेतले होते. मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायाला सुरूवात केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली होती. त्यानंतर 1973 साली ते मुंबई हायकोर्टाचे पहिल्यांदा न्यायाधीश झाले. त्यानंतर 1989 साली सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनले. 1995 साली निवृत्त झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सहभागी राहिले. ते वर्ल्ड प्रेस कौन्सिल (लंडन) आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे (पीसीआय) माजी अध्यक्ष राहिले होते. देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते.

2002 च्या गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत काम केले. 2003 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे पी. बी. सावंत अध्यक्ष होते. माहितीचा अधिकार ही संकल्पना सर्वप्रथम अधिकृतरित्या मांडली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.