Sudhagad Fort : तटबंदी व वास्तू संपन्न किल्ले सुधागड दर्शन

दुर्गसेवक किरण चिमटे यांच्या लेखणीतून : Temple of Bhorai Devi

एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’चे नियमित वाचक आणि दुर्गसेवक किरण चिमटे यांनी नुकतीच लोणावळ्याच्या दक्षिणेस रायगड जिल्ह्यात असलेल्या भोरपगड उर्फ सुधागडाला भेट दिली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडी या गावातून निघाल्यापासून ते परत येईपर्यंतचा प्रवास त्यांनी शब्दबद्ध केला आहे.

“या रविवारी तिकोणागडाची रजा घेतली आणि ब-याच दिवसांपासून दर्शनाची आतुरता असलेला परंतू भेट देता येत नसलेल्या किल्ले सुधागडाचे दर्शन घेतले.

किल्ले तिकोणागडावरील दुर्गसेवकांसोबतच रविवारी भल्या पहाटेच गडाकडे मार्गस्थ झालो. पालीच्या श्री बल्लाळेश्वराचे बाहेरून दर्शन घेऊन आम्ही ठाकुरवाडी म्हणजे किल्ले सुधागड पायथ्याच्या गावात पोहचलो. सह्याद्रिच्या कुशीतलं आदिवासी बहुल हे छोटेसे पण टापटीप, स्वच्छ असे गाव. गरीब असून देखील पार्किंगच्या नावाखाली पैसे न मागणारे तेथील ग्रामस्थ मनाला भावले.

गडावर जाणारी पायवाट गावातुनच जाते. कुडाच्या आणि पक्क्या सुरेख घरांच्या मधून आम्ही गडाकडे निघालो. पावसाच्या अनुषंगाने शेतात कामाची रेलचेल चालू होतीच. गडाकडे जाणाऱ्या आणि गडावरून येणाऱ्या पर्यटकांना गावातील मुले टक लावून पाहत होती. ही मुले जणू येणा-या जाणा-या पर्यटकांचा अभ्यासच करत होती.

गडाच्या वाटेवरच समाधी स्थळाच्या घडीव दगडाच्या माध्यमातून ऐतिहासिक खाना -खुना आपल्याला दिसायला लागतात. समोर दिसणारा गडाचा बलाढ्य असा पूर्व दिशेकडील चिलखती बुरूज आपल्याला त्याच्या नजरेच्या टप्यात ठेवत स्वत:चे अस्तित्व दाखवून देतो. या ठिकाणी असा प्रश्न पडतो कि गडावर जायचा मार्ग कसा असेल ?

गडावर जाण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी पायरीवरून काही अंतर पार करत उजव्या हाताशी दरीत असणाऱ्या नदीचा आवाज ऐकत आपण दाट झाडीत प्रवेश करतो. उंचच उंच वृक्ष, वेली, विविध पक्षी यांच्या सानिध्यातून चालत असताना गडाच्या दगडी बांधकाम केलेल्या पायऱ्या आपले स्वागत करतात. ते पाहून मनात एक उत्साह निर्माण होतो. खरतर ही एक सुरूवात.

पाय-यांनी वर गेल्यावर आपणास गडकोटांच्या अभियंत्यांच्या अविष्कारातून साकारलेला अखंड उभा कातळबुरूज व त्यावर अधिक मजबुतीसाठी बांधीव चिलखती बुरूज दिसून येतो. हा उभा कातळसा तासून त्याचा वापर बुरूज म्हणून केला आहे. यावरून गड अभेद्य राहण्यासाठी अशा कल्पना करता येतील, याचा खरतर आपण विचार देखील करू शकत नाही. इथे तर ते प्रत्यक्षात पाहायला मिळते. असाच बुरूज किल्ले लोहगडच्या विंचू काटा येथेही आहे.

थोडे पुढे गेल्यावर आपल्याला गड चढताना जो बुरूज आपल्यावर नजर ठेऊन होता तो दिसतो. या ठिकाणची दरी पाहता धडकीच भरते. कारण खोल दरीत कोणताच अडथळा दिसत नाही. नजरेच्या टप्प्यात येते ते थेट दरीचे खालचे टोकच.

आता गडावर प्रवेश होतो. गडावर एवढे मोठे विस्तीर्ण पठार व त्यावर ठिकठिकाणी वास्तूंच्या जोतीच जोती दिसून येतात. या ठिकाणी प्रकर्षाने डोळ्यात भरतो तो म्हणजे समोर दिसणारा तैल – बैलचा उभा कडा. त्याचे रौद्ररूप पाहून कोणीही नतमस्तक होईल.

डाव्या बाजूला महादेवाचे जीर्णोध्दार केलेले मंदीर दिसते. त्यामागे तलाव आहे. महादेवाचे दर्शन घेऊन पठारावरून सरळ जात राहिले की उजवीकडे सरकार, पंतसचिव वाडा लागतो. मोठमोठ्या लाकडी तुळया, ओटा, दोन प्रवेशदरवाजे, तीन खोल्या असे याचे बांधकाम. पर्यटक याचा वापर रात्र निवासाकरीता करतात. याला लागूनच एका व्यक्तीचे घर आहे. ते कुटुंब कायम गडावर राहते. त्यांच्याकडे पाहता गो. नि. दांडेकर यांनी लिहलेले ‘माचिवरला बुधा’ या छोट्या कादंबरीतील बुधा ही व्यक्ती अशीच असावी असे वाटते.

सरकार, पंतसचिव वाड्याच्या पुढे भोराई देवीचे मंदीर आहे. वाटेत जरा डाव्या हातास वळून गेल्यावर गडाच्या तटबंदीच्या आत चोरदरवाजा लपलेला आहे. एकूण 33 पाय-या असलेल्या चोरदरवाजातून खाली उतरल्यावर आपण तटबंदीच्या बाहेर येतो. चोरदरवाजाची पायवाट जंगलातून धोंडसे गावाकडे जाते.

हा चोरदरवाजा बंद करण्याकरीता चोरदरवाजाच्या मुखाशी एक दरवाजा होता असे दिसते. चोरदरवाजा असलेल्या तटबंदीवरून खाली पाहिले असता मोठी दरी दिसते. समोरच गडाचा एक भाग खाली उतरत गेलेला दिसतो. त्या ठिकाणी एक तटबंदी व बुरूज उतरताना दिसतो. अतिशय अवघड ठिकाणी बांधकाम केल्याचे दिसते.

येथुन पुन्हा वर आल्यावर गजलक्ष्मी व भोराई मंदीराजवळ आपण पोहचतो. भोराईदेवी मंदीरासमोरच दीपमाळ, वीरगळी तसेच समाधी दिसतात. या गडावर असलेल्या येवढ्या वीरगळी दुसऱ्या गडावर मला तरी पहावयास मिळाल्या नाही. देवीचे मंदीर मराठेशाही बांधकाम प्रकारातील असून मंडपात मोठी घंटा, वाघ व गाभाऱ्यात तुळयांना काचेच्या हांड्या आहेत. मंदीर परिसरात वाऱ्याचा वेग जास्तच आहे. जवळच मारूतीराय मंदिर आहे.

आता उत्सुकता होती ती महादरवाजाची. देवीच्या मंदिरासमोरील वाट धोंडसे गावाच्या वाटेकडे जाते. या वाटेवरून काही अंतर चालून गेल्यावर अजस्त्र महादरवाजा दिसतो. हा दरवाजा बांधिव नसून तो कातळात खोदून तयार केलेला आहे. त्यात मोठ मोठ्या दोन देवड्या आहेत. गोमुखी पद्धतीच्या दरवाजास भेदणे महाकठीण काम.

महादरवाजा पाहता बांधणाऱ्यांनी काय कल्पकतेनी हा दरवाजा निर्माण केला असेल याचा विचार मनात आल्या शिवाय राहत नाही. महादरवाजाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तटबंदी दिसते. ती बऱ्यापैकी अखंड गडाभोवती जेथे गरज आहे तिथ पर्यंत असलेली पहायला मिळते.

परतीच्या वाटेवर पाण्याच्या तिन टाक्या दिसतात. गडावर पिण्याकरीता याचा वापर केला जातो. आम्ही गडावरील ऐवढ्या वास्तूंना भेट देवून गडउतार झालो.

एकंदरीत किल्ले सुधागड हा प्रशस्त गड असून तो अभेद्य रहावा म्हणून कैक उपाययोजना केल्याचे आजही दिसून येते. त्या उपाययोजना अजूनही टिकून आहेत, हे यातले विशेष. सुधागड हा एकांतात पडलेला आहे असे वाटत नाही. त्यावर एक वेगळे प्रसन्न वातावरण जाणवते. गडावर तटबंदी मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. दुसऱ्या गडांच्या तुलनेत सुधागडच्या तटबंदीच्या बाबतीत अजुनही वेळ गेलेली नाही. वेळतच या गडास मदतीचा हात दिला तर सर्व वास्तू टिकू शकतील.

पुढील वेळी जाईल तर संवर्धनाचे कार्य करण्यासाठीच असा चंग आम्ही मनाशी बांधला आणि सुधागड उतरलो.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.