Pimpri : शहरात चार अपघाताच्या घटना; एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात दिघी, भोसरी एमआयडीसी, भोसरी आणि हिंजवडी परिसरात चार अपघाताच्या घटना घडल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 18) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिली घटना 16 जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता पुणे-आळंदी रोडवर दत्तनगर दिघी येथे घडली. याप्रकरणी समीर शरद आपटे (वय 36, रा. दत्तनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मंजूबा आश्रुबा गव्हाडे (वय 26, रा. लांडेवाडी, भोसरी. मूळ रा. दुधगाव, ता. सोनपेठ, जि. परभणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात शरद त्र्यंबक आपटे (वय ७०) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शरद हे टेम्पो चालक होते. 16 जानेवारी रोजी ते पुणे-आळंदी रोडने टेम्पो (एम एच 14 / एच एम 4827) चालवत जात होते. दत्तनगर दिघी येथे टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबले असता आरोपी गव्हाडे याने त्याची कार (एम एच 14 / एच डब्ल्यू 9999) भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या टेम्पोला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शरद यांचा मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

दुसरी घटना 3 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता पुणे-नाशिक रोडवर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर घडली. कांचन रवींद्र कुलकर्णी (वय 43, रा. कल्याणीनगर, येरवडा) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एम एच 14 / एच ए 1045 वरील दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी पुणे-नाशिक रोडने जात असताना आरोपी दुचाकीस्वार मागून आला. त्याने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या पायाला दुखापत झाली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

तिसरी घटना 25 जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास हिंजवडी येथे घडली. रावसाहेब शामराव पाटील (वय 68, रा. देठणा, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) असे जखमी झालेल्या पादचा-याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमोद गंगाधर आरोटे (वय 27, रा. मुंगसे वस्ती, छत्रपतीनगर, राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हिंजवडी येथे पायी चालत होते. त्यावेळी आरोपी आरोटे याने त्याचे चारचाकी वाहन सार्वजनिक रस्त्यावरून भरधाव चालवून फिर्यादी पाटील यांना धडक दिली. चारचाकीच्या जोरदार धडकेने पाटील गंभीर जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

चौथी घटना मंगळवारी (दि. 18) दुपारी दोन वाजता भोसरी येथे उड्डाण पुलाजवळ घडली. गोरख गोरक्षनाथ लांडगे (वय 26, रा. सावरगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एम एच 14 / एफ टी 0160 वरील टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची कार भोसरी येथे उड्डानपुलाजवळ रस्त्याच्या बाजुला पार्क केली होती. आरोपीने त्याच्या टेम्पोने कारला धडक दिली. यामध्ये कारचा बंपर, हेडलाईट, बोनेट, बंपर गार्डचे नुकसान झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.