chakan : अपहरण करून खंडणी मागितल्या प्रकरणी चौघांना अटक

0

एमपीसी न्यूज – रिक्षाचे पैसे देण्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. तरुणाला धमकावून त्याच्या क्रेडिट कार्डवरून दारू खरेदी केली. त्यानंतर अपहरण केलेल्या तरुणाच्या भावाकडे 25 हजार रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 20) दुपारी पाच ते शनिवारी (दि. 21) दुपारी बारा वाजताच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहर परिसरात घडला. पोलिसांनी अपहरण करणा-या चौघांना अटक केली आहे.

सिकंदर उर्फ मोहम्मद रफिक इस्माईल नदाफ (वय 32, रा. वल्लभनगर, पिंपरी. मूळ रा. निगडी), कुमार तात्याराम पांडागळे (वय 32, रा.दळवी नगर, निगडी), अमित पांडुरंग गायकवाड (वय 25, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), प्रमोद उर्फ पप्पू रोहिदास फुलपगारे (वय 34, रा. गांधीनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मनीषकुमार विष्णूप्रसाद भगत (वय 24, रा. नाणेकवरवाडी, ता. खेड. मूळ रा. तुलसीकिता पथरगामा, जि. गोड्डा, झारखंड) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत शनिवारी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषकुमार नाणेकरवाडी येथे डिप्लोमा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतात. त्यांचा मित्र अनिल गोरे हा रिक्षा चालवतो. अनिल आणि आरोपी यांचे रिक्षाच्या पैशांवरून वाद सुरु आहेत. त्यातून आरोपी शुक्रवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी मनीषकुमार यांच्या रूमवर आले. त्यांनी अनिल गोरे बाबत चौकशी केली.

त्यानंतर आरोपींनी मनीषकुमार यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून हाताने मारहाण करत वल्लभनगर येथे नेले. वल्लभनगर येथे मनीषकुमार यांचे पैशांचे पाकीट आणि मोबाईल फोन आरोपींनी काढून घेतला. मनीषकुमार यांना त्यांच्या क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक जबरदस्तीने विचारून क्रेडिट कार्डद्वारे आरोपींनी दारू खरेदी केली. त्यानंतर मनीषकुमार यांचा भाऊ अभिषेक भगत यांना 25 हजार रुपयांची खंडणी मागितली. 25 हजार रुपये दिले तरच मनीषकुमार यांना सोडून देतो, अशी धमकी आरोपींनी मनीषकुमार यांच्या भावाला फोनवरून दिली.

आरोपींनी मनीषकुमार यांना आरोपी सिकंदर याच्या खोलीत जबरदस्तीने डांबून ठेवले. शनिवारी सकाळ पर्यंत वरिष्ठ पोलीस अधिका-यांना या प्रकरणाची खबरही नव्हती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून चारही आरोपींनी अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.