Wakad Crime News : सोसायटी फंडाचा अपहार केल्याप्रकरणी प्रशासकासह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सोसायटीचा प्रशासक, कमिटी सभासद आणि अन्य दोघांनी मिळून सोसायटीच्या फंडचा अपहार केला. तसेच सोसायटीच्या सर्वसाधारण सभेमध्ये बोगस मतदान करून चुकीचे निर्णय घेत फसवणूक केली. हा प्रकार 19 मे ते 2 जुलै 2021 या कालावधीत ओमेगा पॅराडाईज, फेज एक, को ऑप हाऊसिंग सोसायटी वाकड येथे घडला.

प्रशासक संजय पडोळकर, कमिटी सभासद दिनेश पंडित, सोसायटीच्या इएफजीएच विंगचे मॅनेजर गोविंद चितळकर, सोसायटीचे पुरवठादार अमर धुमाळ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हेमंत विजय धिया (वय 37, रा. ओमेगा पॅराडाईज, फेज एक, को ऑप हाऊसिंग सोसायटी वाकड) यांनी गुरुवारी (दि. 14) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय पडोळकर याला उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर तीन या कार्यालयाने वाकड येथील ओमेगा पॅराडाईज, फेज एक, को ऑप हाऊसिंग सोसायटीचा प्रशासक म्हणून नेमले आहे. आरोपी प्रशासक आणि कमिटी सभासद यांनी इतर दोघांसोबत मिळून इतर सभासदांना विश्वासात न घेता सोसायटीचे परस्पर निर्णय घेतले. सोसायटी फंडाच्या रकमेचा अपहार केला.

आरोपींनी सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा झूम अॅपवर आयोजित केली. त्याची लिंक व्हाट्सअप द्वारे सभासदांना पाठवून मीटिंगचे नियंत्रण स्वतःच्या हातात ठेवले. मिटिंगमध्ये सोसायटी सभासदांच्या संख्येपेक्षा जास्त सभासद समाविष्ट करून वार्षिक सर्वसाधारण सभेत बोगस मतदान करून घेत चुकीचे निर्णय घेऊन सोसायटीची फसवणूक केली. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.