Wakad Crime News : महिलेच्या विनयभंग प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शेरेबाजी करत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 13) रात्री रहाटणी फाटा, थेरगाव येथे घडली . संबंधीत व्यक्तीने महिलेच्या घरी येऊन शिवीगाळ करून मारहाण केली तसेच दगड मारून महिलेच्या पतीला देखील जखमी केले आहे. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 16) फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश कदम (वय 27), आदित्य अढारे (वय 22), विनोद सातपुते (वय 25), तसेच एक अनोळखी इसम (सर्व रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची बहीण हे फिर्यादीच्या पतीला शोधण्यासाठी रहाटणी फाटा येथे गेले होते. त्यावेळी फिर्यादीच्या तोंडओळखीचा आरोपी आदित्य अढारे व त्याचे मित्र आरोपी महेश कदम व विनोद सातपुते हे तिथे आले. आरोपी आदित्य अढारे याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी शेरेबाजी केली. त्यामुळे फिर्यादी त्यांना रागावल्या.

दरम्यान, फिर्यादी व त्यांची बहीण घरी पोहोचल्या. मात्र, काही वेळानंतर आरोपी महेश, आदित्य व विनोद आणि एक अनोळखी मित्र असे चौघेजण फिर्यादी यांच्या घरी आले. आम्हाला शिव्या का दिल्या, असे म्हणून आरोपींनी शिवीगाळ केली. फिर्यादीने घराचे दार उघडले असता आरोपी घरात घुसले. त्यामुळे फिर्यादी घराबाहेर आल्या असता आरोपींनी शिवीगाळ करून फिर्यादीला मारहाण केली. फिर्यादीचे पती भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपी महेश कदम याने फिर्यादीच्या पतीला दगड मारून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.