Talegaon Dabhade : नगरपरिषद पोटनिवडणुकीसाठी चार उमेदवार रिंगणात

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ ब मधील पोटनिवडणुकीत अर्ज छाननीनंतर एकूण चार उमेदवार रिंगणात असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. मतदान ९ जानेवारी रोजी होणार असून मतमोजणी १० जानेवारी रोजी होणार आहे.

सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या वतीने कृष्णा मारुती म्हाळसकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, शहर भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, कार्याध्यक्ष वैभव कोतुळकर, माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे, गिरीश खेर यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.

तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समितीच्या उमेदवार संगीता राजेंद्र शेळके यांनी दोन अर्ज दाखल केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भरलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत एबी फॉर्म सादर केला नसल्याने संगीता शेळके यांचा तो अर्ज अवैध ठरला.

संगीता शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे, महिला अध्यक्षा सुनीता काळोखे, युवक अध्यक्ष आशिष खांडगे तसेच सारिका सुनील शेळके यांच्यासह तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समितीचे नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अपक्ष म्हणून गणेश वामन मोरे आणि हनुमंत सोपान म्हाळसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.