Pune News : अनाधिकृत बांधकाम प्रकरणी कोंढव्यात चार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज : अनधिकृतपणे बांधकाम केल्याबद्दल महापालिकेने बजावलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी बांधकाम विभागाने चार जागा मालकांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. 

कोंढवा परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून महापालिकेने दिलेल्या नोटीसींकडे दुर्लक्ष करणारे जागा मालक आणि विकसकांविरोधात बांधकाम विभागाने विशेष मोहीम सुरु केली असून या मोहिमेअंतर्गत आज चार गुन्हे दाखल करून अनधिकृत बांधकामे करणार्‍यांना दणका दिला आहे.

कोंढवा खुर्द परिसरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असल्याबाबत बांधकाम विभागाने संबधित जागा मालक आणि विकासकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी 11 जानेवारीपासून विशेष मोहीम राबविली आहे.

31 मार्चपर्यंत सुरू राहाणार्‍या या मोहीमेसाठी 25 कनिष्ठ अभियंत्यांची टीम नेमण्यात आली आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकामांना यापूर्वी दिलेल्या नोटीस, संबधितांनी या नोटीसांना दिलेली उत्तरे आणि सादर केलेली कागदपत्रे याचा आढावा घेऊन सद्य:स्थितीची पाहणी केल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कार्यकारी अभियंता ना. दे. गंभीरे यांच्या नेतृत्वाखालील उप अभियंत्यांच्या पथकाने आज स. नं. 46 कोंढवा खु. येथील उजेर सय्यद, सरफराज खान, दादा गायकवाड, एफ. एफ. पठाण यांच्याविरूद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 व 43 अन्वये कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

उजेर सय्यद यांच्या 50 बाय 30 फूट जागेवर सात मजल्यांचे काम सुरू होते. विशेष असे की, मागील वर्षी 14 जानेवारीला तळमजल्याचे अनधिकृतपणे केलेले बांधकाम पाडून टाकण्यात आले होते. याबाबत संबधितांना नोटीसही बजावली होती. परंतु नुकतेच पाहाणी दरम्यान याठिकाणी 7 मजली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने सय्यद यांच्याविरूद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.