Sangvi : तरुणावर खुनी हल्ल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून तरुणावर खुनी हल्ला केला. तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) दुपारी साडेपाचच्या सुमारास एम के चौक, नवी सांगवी येथे घडली. सांगवी पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

ओंकार किसन शिंगोरे (वय 19, रा. काटे पुरम चौक, पिंपळे गुरव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रसाद सोनटक्के, प्रथम धरमे व अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रसाद याला अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी ओंकार बुधवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास एम के चौक, नवी सांगवी येथील एच डी एफ सी बँकेसमोरील पानटपरी समोर थांबला होता. त्यावेळी ओंकारच्या ओळखीचा आरोपी प्रसाद तिथे आला. ‘तुला मस्ती आली आहे का? तू आमच्या घराजवळ का आला होता. तुझ्याकडे बघतो. तुला आता खल्लास करतो’ असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. अन्य आरोपींनी देखील मारहाण केली.

आरोपी प्रसाद आणि ओंकार यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी देखील भांडण झाले होते. प्रसाद याने ओंकारच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. तर एका अनोळखी आरोपीने सिमेंटचा गट्टू तोंडावर मारत जीवे मारण्याचा प्रयत केला. तर एका आरोपीने कोयत्याचा धाक दाखवला. यामध्ये ओंकार गंभीर जखमी झाला. सांगवी पोलिसांनी आरोपी प्रसाद याला अटक केली आहे. सहाय्य्क पोलीस निरीक्षक एस ए निकुंभ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.