Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या पाच अपघातात चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आळंदी, तळेगाव दाभाडे, देहूरोड, हिंजवडी परिसरात पाच अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत गुरुवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

अपघाताची पहिली घटना शेलगाव आळंदी रोडवर दोन मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. यामध्ये सुखदेव मनोहर पारथी (वय 25, रा. ठाकरवाडी, चर्होली खुर्द) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस हवालदार नितीन पांडुरंग बनकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी विठ्ठल दगडू  झिंजाड रा रासे ता खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विठ्ठल टेम्पो घेऊन आळंदी कडून शेलगाव कडे जात होता त्याने टेम्पो भरधाव वेगात चालून रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीला धडक दिली यामध्ये दुचाकीस्वार सुखदेव गंभीर जखमी झाला त्यातच त्याचा मृत्यू झाला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

अपघाताची दुसरी घटना 18 जुलै 2019 रोजी तळेगाव दाभाडे येथे घडली. सुनंदा राहुल सोनवणे असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अनिकेत जयवंत सोनवणे (वय 21, रा. वराळे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत त्याच्या दुचाकीवरून मयत सुनंदा यांना घेऊन जात होता. भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने एका गतिरोधकावरून जात असताना सुनंदा रस्त्यावर पडल्या. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

अपघाताची तिसरी घटना देहूरोड येथे 4 जानेवारी 2020 रोजी घडली. अभिमन्यू अंकुश कडेकर (वय 27, रा. दुघडचाळ, ता. भोर. मूळ रा. सांगुर्डे, ता. खेड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अंकुश लक्ष्मण कडेकर (वय 54) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अंकुश देहूरोडकडून येलवाडीकडे जाणा-या पुलावरून जात असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये अंकुश यांच्या डोक्याला, नाकाला, पायाला दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

अपघाताची चौथी घटना पुनावळे येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर 16 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वादोन वाजता घडली. पारसमल देविचंद जैन (वय 55) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा भावेश पारसमल जैन (वय 23, रा. बालाजीनगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे वडील भाड्याच्या कारमधून जात होते. पुनावळे येथे कार चालकाने अचानक ब्रेक मारल्याने पारसमल खाली पडले. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

अपघाताची पाचवी घटना देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर ऑर्चिड हॉटेलसमोर 5 मार्च रोजी पहाटे पावणे एकच्या सुमारास घडली. संभाजी धनराज पाटील (वय 41, रा. सामनेर, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांनी एम एच 17 / बी वाय 6676 या टँकर चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरून जात असताना आरोपी दूध टँकर घेऊन जात होता. त्याने फिर्यादी यांच्या बसला मागून धडक दिली. यामध्ये बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातात टँकर आणि बसचे नुकसान झाले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.