Pimpri news: दि सेवा विकास बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह चार संचालकांचा राजीनामा

एमपीसी न्यूज : पिंपरी कॅम्पातील आर्थिक कणा संबोधल्या जाणाऱ्या  दि सेवा विकास को-ऑप बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी यांनी राजीनामा दिला आहे. प्रकृतीचे कारण देत अध्यक्ष, संचालकपदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह तीन संचालकांनी देखील  राजीनामे दिले आहेत. दरम्यान, कार्यकाळ शिल्लक असतानाच अध्यक्षांसह संचालकांनी अचानक राजीनामा दिल्याने याची जोरदार चर्चा  कॅम्प परिसरात रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्प परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांमुळे आर्थिक भरभराट झालेली बँक म्हणून सेवा विकास बँक ओळखली जाते. त्यामुळे या बँकेला पिंपरी कॅम्पातील आर्थिक कणा संबोधले जाते.  व्यापारी व्यावसायिक व्यक्तींमध्ये ही बँक अग्रणी समजले जाते. या बँकेच्या 25 शाखा असून मोठ्या प्रमाणात बँकेने आपला विस्तार केलेला आहे. ही बँक  पिंपरी कॅम्पातील राजकारणाचे केंद्र बिंदू मानली जाते. अनेक व्यापारी, व्यावसायिक या बँकेशी जोडलेले आहेत. मुख्यत्वे सिंधी समाजातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या बँकेची मोट बांधली. त्यामुळे व्यापारी केंद्रबिंदू असलेली ही बँक पुढे कॅम्पातील राजकारणाचाही केंद्रबिंदू बनली आहे.

तब्बल दहा वर्षांपासून अमर मूलचंदानी यांच्याकडे बँकेची सूत्रे आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी अद्याप शिल्लक आहे. असे असताना बँकेच्या संचालक तसेच अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांच्यासह संचालक चंद्रशेखर अहिरराव, राजेश सावंत, अ‍ॅड. सुनील डोंगरे यांनीही  संचालकपदाचा राजीनामा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला.

बँकेच्या संचालक मंडळाची मंगळवारी (दि.5) बैठक झाली. त्यावेळी मूलचंदानी, अहिरराव, सावंत यांनी प्रकृतीचे तर अ‍ॅड. डोंगरे यांनी वैयक्तीक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहकार विभागाचे पुणे येथील आयुक्त यांच्याकडे राजीनामे सादर केले आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.