Chinchwad Crime News : चिंचवड, पिंपरी, रावेत, वाकड मधून चार अल्पवयीन मुले बेपत्ता

एमपीसी न्यूज – चिंचवड, पिंपरी, वाकड आणि रावेत पोलीस चौकीच्या हद्दीतून प्रत्येकी एक अशी चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 13) अज्ञातांच्या विरोधात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुलगी बेपत्ता असल्याचे एका व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 17 वर्षीय मुलगी घराजवळील दुकानात जाऊन येते म्हणून घरातून गेली मात्र ती परतलीच नाही. संबंधीत घटना 13 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याबाबत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

दरम्यान, पिंपरी पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या पंधरा वर्षीय मुलीला घरातील काम सांगितले, मात्र ते काम करण्यासाठी मुलीने नकार दिला. त्यावरून फिर्यादी यांनी मुलीला मारहाण केली आणि त्याच रागातून मुलगी घर सोडून निघून गेली. अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय असल्याचे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस सुद्धा आणखी तपास करीत आहेत.

आणखी एका घटनेत, रावेत पोलीस चौकीमध्ये एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यांची पंधरा वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची त्यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

तसेच, वाकड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा सोळा वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे. त्याला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.