Maval : चार महिन्यानंतरही अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूलाच; बस उचलण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अपघातातील खाजगी बस अद्याप रस्त्याच्या बाजूलाच पडून आहे. विचित्र अवस्थेतील अपघातग्रस्त बस वारंवार नजरेस पडत असल्याने प्रवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. त्यामुळे बस लवकरात लवकर उचलून न्यावी, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

एमपीसी न्यूजचे वाचक दिनेश घारे यांनी याबाबत माहिती दिली. 20 ऑक्टोबर 2019 रोजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बौर गावाजवळ मुंबई-पुणे लेनवर एका खाजगी बसचा (एम एच 09 / बी ए 3006) भीषण अपघात झाला. अपघातामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताच्या घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूला ठेवली. चार महिन्यानंतर देखील ती बस दुरुस्तीसाठी अथवा रस्त्याच्या बाजूवरून उचलण्यात आली नाही.

अर्धवट तुटलेल्या अवस्थेतील बस पाहिल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणारे नागरिक तसेच स्थानिक नागरिकांच्या वारंवार निदर्शनास येत आहे. अर्धवट तुटलेल्या अवस्थेतील अपघातग्रस्त बस बघितल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला ठेवलेली बस लवकरात लवकर उचलून न्यावी, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.