Pune : अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-या गुन्हेगाराला आश्रय देणा-या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार श्वेतांग भास्कर निकाळजे (रा.मंगळवार पेठ) याने एप्रिल महिण्यात मंगळवार पेठेतील अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात हलगर्जीपणा होत असल्यामुळे कोर्टाने ताशेरे ओढले होते. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासात गुंड निकाळजेच्या साथीदारांनी त्याला महिनाभर एका फार्महाऊसवर लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या चौघांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली.

किरण अशोक इंदलकर (वय-रा. आनंदनगर, सिंहगड रोड), कमलेश संपत भगत (वय-रा.तोरणा प्रांगण, वडगाव धायरी), चेतन विजय खेडेकर (रा.कल्पतरू कॉलनीस वारजे) आणि लक्ष्मण आनंदा राऊत (वय-रासकर बिल्डींग, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेले आरोपी हे गुंड श्वेतांग निकाळजे याचे व्यावसायीक पार्टनर आणि मित्र आहेत. यातील आरोपी चेतन खेडकर याचे पारगाव-मेमाने, ता.पुरंदर, जि.पुणे येथे फार्महाऊसवर आहे. याच फार्महाऊसवर आरोपींनी निकाळजे याला तब्बल एक महिना लपवून ठेवले होते आणि त्याला वेळोवेळी पैसे पुरवल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ते आरोपी निकाळजे आणि पीडित मुलीचा शोध घेण्यासाठी फार्महाऊसवर पोहोचले होते. परंतु त्यापुर्वीच निकाळजे पीडित मुलीला घेऊन पसार झाला होता.

गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून आरोपी श्वेतांग निकाळजे आणि पीडित मुलीचा शोध सातत्याने सुरू असून तो पोलिसांच्या टप्प्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला लवकरच अटक केली जाईल आणि त्याला अश्रय देणा-यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.