Pimpri : चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये आठजण जखमी; एकाला अटक

एमपीसी न्यूज – मोशी, भोसरी, चिंचवड, तळेगाव परिसरात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये आठजण जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत रविवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या अपघातात संदीप पंढरीनाथ चव्हाण (वय 25, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अरविंद भाऊप्रकाश कुशावाह (वय 24, रा. खराबवाडी, चाकण. मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता फिर्यादी चव्हाण यांच्या पत्नी आणि भाची पुणे-नाशिक रस्त्याने पायी चालत जात होत्या. बनकरवस्ती येथे आल्यानंतर आरोपी दुचाकीवरून (एम एच 14 / ई के 7739) भरधाव वेगात आला. त्याने दोघींना धडक दिली. यामध्ये दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत रवींद्र संभाजी देसाई (वय 45, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिलकुमार बिरादार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेपाच वाजता फिर्यादी यांच्या आई सुलभा संभाजी देसाई आणि एक महिला सुरेखा दिवाकर घाटगे (वय 65, रा. भोसरी) या दोघी दिघी रोड येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी एम एच 12 / ई वाय 7063 या दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांना धडक देऊन सुलभा देसाई यांना जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या घटनेत बाबासाहेब ज्ञानोबा व्यवहारे (वय 52, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॉ. शुभांगी अविनाश काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 22 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. फिर्यादी व्यवहारे बुलेटवरून जात होते. ते चिंचवड गावातील भाजी मंडई येथे थांबले असता आरोपीने एम एच 14 / एफ जी 8907 ही कार भरधाव वेगात चालवून व्यवहारे यांच्या बुलेटला धडक दिली. यामध्ये व्यवहारे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

चौथ्या घटनेत अखिलेश ललंद सहाने (वय 28, रा. कल्याणपूर, ता. भोरे, जि. गोपालगंज, बिहार) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विनोद शंकर नलावडे (रा. दिघीगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एक मार्च रोजी सकाळी सहा वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्यावर घडली. आरोपी हा कार चालक आहे. त्याने त्याची कार (एम एच 12 / के एन 1971) भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या टेम्पोला (जी जे 15 / वाय वाय 3506) पाठीमागून धडक दिली. यामध्ये आरोपीच्या कारमधील प्रवासी संजय विश्वनाथ चव्हाण (रा. कृषीनगर, उत्तरप्रदेश), गुरुप्रीत सिंग (रा. अमृतसर, पंजाब) आणि अन्य दोघे गंभीर जखमी झाले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.