Bhosari News : चार लग्न करून पोलीस महिलेसह चार महिलांची फसवणूक

60 वर्षीय बहाद्दरांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पहिल्या बायकोचे निधन झाल्याचे खोटे सांगून दुसरे लग्न केले. त्यानंतर दुस-या बायकोच्या परस्पर तिसरे आणि चौथेही लग्न केले. यातील एका पत्नीने चार-चार लग्न करणा-या पती महोदयांवर थेट बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी देखील 60 वर्षीय बहाद्दरावर गुन्हा दाखल केला आहे. त्याने फिर्यादी पत्नीवर लग्नापूर्वी आणि लग्नानंतर बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

च-होली बुद्रुक येथील 60 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या दुस-या पत्नीने याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सन 2013 ते 20 डिसेंबर 2020 या कालावधीत विनायक नगर नवी सांगवी, भोसरी, प्रतीक लॉज चाकण, नित्यानंद लॉज फुरसुंगी येथे घडला आहे. आरोपी व्यक्तीने त्याची पहिली पत्नी मयत झाली आहे, असे खोटे सांगून फिर्यादी महिलेसोबत सन 2014 साली विवाह केला. त्यानंतर त्याने आणखी दोन महिलांसोबत विवाह केला. त्यामध्ये एका पोलीस महिलेचा देखील समावेश आहे. फिर्यादी महिलेच्या परस्पर विवाह करून तिची फसवणूक केली.

लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतर फिर्यादी महिलेचा क्रूरतेने लैंगिक छळ केला. फिर्यादी महिलेला आरोपीने मारून टाकण्याची धमकी दिली. हा त्रास वाढत गेल्याने तिने थेट पोलीस ठाणे गाठत गुन्हा नोंदवला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.