Ravet : इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) दुपारी पावणेचारच्या सुमारास रावेत येथे घडली.

विहान अंकित सिंघल (वय 4) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहान याच्या घरी शुक्रवारी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त घरी पाहुणे आले होते. पाहुण्यांचा पाहुणचार आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम यामध्ये घरातील सर्वजण व्यस्त होते. दरम्यान, चार वर्षाचा विहान खेळत खेळत घराच्या गॅलरीजवळ आला. गॅलरीतून त्याचा तोल जाऊन पाचव्या मजल्यावरून तो खाली पडला. यामध्ये विहान गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथून पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आनंदाच्या प्रसंगी विहानच्या जाण्याने संपूर्ण सिंघल कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. वास्तुशांतीचा अतिशय मंगल प्रसंग घरात असताना ही घटना घडल्याने सिंघल कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कांबळे याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.