Wakad : पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार वर्षीय चिमुकली काही तासातच सापडली

एमपीसी न्यूज – चार वर्षांची चिमुकली घराबाहेर फिरता फिरता रस्ता भटकली. घरापासून तब्बल तीन किलोमीटर दूर चालत गेली. काही वेळेत पालकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. वाकड पोलिसांनी हरवलेल्या मुलीची माहिती तात्काळ संबंधित यंत्रणांद्वारे प्रसारित केली. पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे चिमुकलीचा काही तासांमध्ये शोध लागला आहे. आपली मुलगी सापडताच पालक आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

संतोषी विजय साहू (वय 4, रा. थेरगाव), असे हरवून सापडलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी याबाबत माहिती दिली. विजय साहू थेरगाव येथे राहतात. आज, शुक्रवारी (दि. 1) त्यांची मुलगी संतोषी घराबाहेर खेळत होती. दुपारी अडीचच्या सुमारास संतोषी खेळत खेळत रस्त्यावर आली आणि चालू लागली. रस्त्यावरून बेफिकीरपणे ती चालत राहिली. काही वेळेनंतर संतोषी घर आणि परिसरात नसल्याची बाब पालकांच्या लक्षात आली. पालकांनी तात्काळ वाकड पोलिसांशी संपर्क केला.

वाकड पोलिसांनी संतोषीचे फोटो आणि माहिती संबंधित यंत्रणांद्वारे प्रसारित केली. वाकड परिसरात पोलीस संतोषीच्या शोधात निघाले. संतोषी राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात झाली. काही सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका सीसीटीव्ही कॅमे-यात संतोषी बिनघोरपणे चालत जाताना दिसली. ती ज्या मार्गावरून चालत गेली, त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात झाली.
संतोषीच्या घरापासून सुमारे तीन किलोमीटर दूर असलेल्या तापकीर चौकात संतोषी एकटीच उभी असलेली एका वाहतूक पोलीस कर्मचा-याच्या निदर्शनास आले. त्यांनी संतोषीकडे चौकशी केली. तसेच याबाबत वाकड पोलिसांशी संपर्क केला. यामुळे संतोषी काही तासातच तिच्या पालकांच्या कुशीत विसावली. संतोषी सापडल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.