Nigdi : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या बहाण्याने 53 लाखांची फसवणूक करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू, तसेच मी शय्यासोबत करण्यास तयार आहे, असे एका अनोळखी महिलेने व्हाटसअपद्वारे भासविले. तसेच वडिलांना कँसर असून त्यांच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत तरुणाकडून ऑनलाईन पद्धतीने 53 लाख 65 हजार रुपये घेतले. घेतलेले पैसे परत न करता आश्वासने दिलेली महिला अचानक गायब झाली. या महिलेला निगडी पोलिसांनी हैद्राबादमधून अटक केली असून तिच्यासोबत तिच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे.

प्रवलिका राजेश गौड (वय 24) आणि राजेश प्रभाकार गौड (वय 28, दोघे रा. हैद्राबाद, तेलंगणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जहीर युसूफ शिकलगार (वय 30, रा. सेक्‍टर नंबर 21, अरमान बिल्डिंग, यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहीर आणि प्रवलिका यांची वर्षभरापूर्वी व्हॉटसऍपद्वारे ओळख झाली होती. यावेळी तिने फिर्यादीला शय्यासोबत व लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे आमिष दाखवले. त्याचा विश्‍वास संपादन केला. काही दिवसांनी प्रवलिका हिने तिच्या वडिलांना कॅन्सर असल्याचे जहीर यांना सांगितले. कॅन्सर या आजाराच्या उपचारासाठी वारंवार पैशांची गरज असल्याने जहीर यांच्याकडे महिलेने वारंवार आर्थिक मदत मागितली. घेतलेले पैसे ठरलेल्या वेळेत परत करीन असे तिने सांगितले. त्यामुळे जहीर यांनी वेळोवेळी पेटीएम, फोन पे, मोबिक्विक, एसबीआय व्हॅलेट एचडीएफसी बँकेतून एनईएफटी आणि आयएमपीएसद्वारे प्रवलिकाला 53 लाख 65 हजार रुपये पाठविले. परंतु दिलेल्या वेळेत तिने पैसे परत केले नाहीत. जहीर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गुन्हा दाखल केला होता.

निगडी पोलिसांनी मोबाईल क्रमांक व बॅंक खाते याच्याद्वारे हैद्राबाद येथे जाऊन तपास केला. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार संशयीत महिलेला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या महिलेची कसून चौकशी केली असता, तिनेच हा गुन्हा केला असून तिने या पैशातून कार, घर, दागिने, महागड्या वस्तू, महागडे मोबाईल खरेदी केल्याचे कबूल केले. यावेळी पोलिसांनी तिला साथ देणाऱ्या तिच्या पतीलाही अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी 10 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी निगडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव, शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली किसन वडेकर, मच्छिंद्र घनवट, आनंद चव्हाण, राम साबळे, विश्‍वास नाणेकर, चेतन सावंत, सुनिल शिंदे यांच्या पथकाने केली. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.