Chakan News : चेन मार्केटिंग करून पैसे उकळणाऱ्या चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चेन मार्केटिंग करून लोकांना जोडण्यास सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 जून ते 23 ऑक्टोबर 2021 या कालावधीत चाकण येथे घडला.

कविता दीपक जगतकर (वय 35, रा. खराबवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमडी चेअरमन महेंद्र मनोहर देवणे, डायरेक्टर प्रीतम शितोळे, फाउंडर सौरभ शिवाजी गाडे, तरुण कमलेश साहू (सर्व रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी www.greenhome.com या वेबसाईटवरून 1600 रुपयांप्रमाणे तीन आयडी काढले. त्याचे 4 हजार 800 रुपये भरले. त्यानंतर साखळी पद्धतीने लोकांनी चार लाख 91 हजार 300 रुपये भरले. आरोपींनी एकूण 4 लाख 96 हजार 100 रुपये तसेच प्रत्येकी 50 रुपये रजिस्ट्रेशन फी घेतली. सर्वांना मासिक 20 ते 22 हजार रुपये पगाराचे अमिश दाखवले. आरोपींकडे कोणत्याही प्रकारचा शासकीय कार्यालयाचा तसेच रिझर्व्ह बँकेचा परवाना नसताना पैसे उकळून लोकांची फसवणूक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.