Pimpri News : बोगस एफडीआर प्रकरणी पालिकेच्या पाच ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची कामे मिळविण्यासाठी बोगस एफडीआर (बँक गॅरंटी) सादर करून कामे घेणा-या पाच ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोगस एफडीआर सादर करून पाच ठेकेदारांनी तब्बल शहरातील 52 कामांचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागातून स्थापत्य विषयक कामाच्या निविदा काढल्या जातात. त्यात लघुत्तम दराने जो ठेकेदार निविदा सादर करेल त्या ठेकेदाराला ती कामे दिली जातात. दरम्यान, पालिकेची कामे घेताना संबंधित ठेकेदाराला एफडीआर अथवा बँक गॅरंटी द्यावी लागते. पालिकेच्या अनेक कामांमध्ये ठेकेदारांनी बोगस एफडीआर पालिकेला सादर करून कामे मिळवली असल्याची बाब पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी याबाबत चौकशी करून पाच ठेकेदारांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

फसवणुकीचा पहिला गुन्हा मे. पाटील अँड असोसिएटचे मालक सुजित सूर्यकांत पाटील (वय 26, रा. भोसरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. पाटील अँड असोसिएटने 29 जानेवारी 2019 ते 19 जानेवारी 2020 या कालावधीत पालिकेची पाच स्थापत्य विषयक कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.

फसवणुकीचा दुसरा गुन्हा मे. कृती कन्स्ट्रक्शनचे मालक विशाल हनुमंत कु-हाडे (वय 29, रा. पिंपरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. कृती कन्स्ट्रक्शनने 24 डिसेंबर 2019 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक चार कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक, आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

फसवणुकीचा तिसरा गुन्हा मे. एस बी सवईचे मालक संजय बबन सवई (रा. चिंचवड) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. एस बी सवईने 9 ऑक्टोबर 2018 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक सात कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक, आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.

फसवणुकीचा चौथा गुन्हा मे. वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे (वय 47, रा. भोसरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. वैदेही कन्स्ट्रक्शनने 9 ऑक्टोबर 2018 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक 12 कामे घेतली होती. त्यात त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र राजगुरू नगर शाखा, पंजाब नॅशनल बँक नाना पेठ पुणे यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बँकांनी दिला नसल्याचे आढळून आले आहे.

फसवणुकीचा पाचवा गुन्हा मे. डी डी कन्स्ट्रक्शनचे मालक दिनेश मोहनलाल नवानी (वय 28, रा. पिंपरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. डी डी कन्स्ट्रक्शनने 27 जून 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक 24 कामे घेतली होती. त्यात त्यांनी पंजाब नॅशनल बँक नाना पेठ पुणे शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बँकेने दिला नसल्याचे आढळून आले आहे.

ठेकेदारांनी बोगस एफडीआर सादर करून पालिकेची कामे मिळवली असल्याने त्यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करत फौजदारी कारवाई कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पोलिसांना दिले होते. त्यानुसार पाच ठेकेदारांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.