Hinjawadi News : एटीएम बसवण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एटीएम बसवण्याच्या मोबदल्यात ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून 70 ते 80 गुंतवणूकदारांकडून 10 लाख रुपये घेतले. मात्र एटीएम न बसवता गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2020 पासून ते 4 सप्टेंबर 2021 या कालावधीत आदित्य शगुन मॉल, बावधन, पुणे येथे घडला.

मे. अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर राजू भीमराव साळवे (वय 41), त्याची पत्नी ज्योती राजू साळवे (वय 34, दोघेही रा. वारजे माळवाडी, पुणे), मॅनेजर कुमार श्रीधर गोडसे (रा. बावधन बुद्रूक, पुणे) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी परमेश्वर दादाराव पाटील (वय 45, रा. अहमदनगर) यांनी शनिवारी (दि. 4) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू साळवे हा मे. अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्ट असून, आरोपी गोडसे हा कंपनीचा मॅनेजर आहे. आरोपी राजू साळवे तसेच त्याची पत्नी आरोपी ज्योती साळवे व आरोपी गोडसे यांनी फिर्यादी व अन्य गुंतवणूकदारांना एटीएम बसून देण्याचे सांगून मोबदला म्हणून ज्यादा परताव्याचे आमिष दाखविले.

त्यातून फिर्यादीसह इतर 70 ते 80 गुंतवणूकदारांकडून आरोपींनी 10 लाख रुपये अनामत रक्कम घेतली. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे ठेवलेल्या अनामत रकमेचा अपहार केला. तसेच एटीएम न बसवता सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.