Chinchwad Crime News : दुकानाच्या बाहेर एटीएम बसवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दुकानाच्या बाहेर एटीएम मशीन बसवून देतो, असा बहाणा करून एका व्यक्तीने व्यावसायिकाकडून 10 लाख 20 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर एटीएम मशीन बसवून न देता फसवणूक केली. ही घटना डिसेंबर 2019 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत बुडुख सराफ दुकानात चिंचवडगाव येथे घडली.
धनंजय माधवराव बुडुख (वय 65, रा. चापेकर चौक, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील बळीराम मेश्राम उर्फ महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या सराफ दुकानाच्या बाहेर एटीएम मशीन बसवून देतो. प्रत्येक ट्रान्झेक्शनमागे तुम्हाला चार रुपये फायदा होईल, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांची दिशाभूल करून तीन एटीएम मशीन देण्यासाठी फिर्यादीकडून 10 लाख 20 हजार रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.