Pimpri News : जमिनीच्या व्यवहारात 4 कोटी 39 लाखांची फसवणूक

तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सुरुवातीला ठरलेल्या किमतीत जमिनीचा व्यवहार केला. ठरलेल्या किमतीनुसार पैसे घेऊन कागदपत्रे देखील तयार केली. त्यानंतर जागेचा प्रत्यक्ष ताबा न देता वाढीव किमतीने पुन्हा खरेदी करण्याची मागणी केली. यात तब्बल 4 कोटी 39 लाखांची फसवणूक झाल्याचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीरज वालीया, विरेंद्रकुमार नागीया (रा. बाणेर, पुणे), अजित शितो अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सतीश एकनाथ शिंदे (वय 45, रा. प्राधिकरण, चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून चिंचवड एमआयडीसी मधील डी ब्लॉकमध्ये असलेल्या एका जागेचे विकण्याचे अधिकार आरोपी वालीया यांच्याकडे दिले. 22 नोव्हेंबर 2018 रोजी नागीया यांनी फिर्यादी शिंदे, प्रकाश सरोदे आणि प्रकाश तांबे यांची बैठक घेतली. त्यात 2 हजार 825 रुपये प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे सतीश शिंदे यांना 7 हजार 300 स्क्वेअर फूट आणि सरोदे यांना 5 हजार 850 स्क्वेअर फूट जागा विकण्याचे ठरवले.

ठरलेल्या दरानुसार शिंदे आणि सरोदे यांनी वेगवेगळ्या बँकेच्या माध्यमातून 4 कोटी 39 लाख 50 हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी शिंदे यांना जागेचा ताबा दिल्याचे पत्र दिले. मात्र प्रत्यक्षात जागेचा ताबा दिला नाही. त्यानंतर आरोपी वालीया यांनी त्याच जागेचा भाव 3 हजार 500 रुपये प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे वाढवून नवीन दराने नवीन व्यवहार कारण्यास सांगीतले.

यासाठी शिंदे आणि सरोदे यांनी नकार दिला असता त्यांनी खरेदी केलेल्या जागेत येण्यास आरोपींनी मज्जाव केला. तसेच शिंदे आणि सरोदे यांच्या कडून घेतलेल्या 4 कोटी 39 लाख 50 हजार रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.