Pune News : ‘ड्रेनेजचे काम करून घ्या नाहीतर दंड भरावा लागेल’ असे सांगून एकाची 82 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज : मी पुणे महानगरपालिकेतून आलो आहे, ड्रेनेज चोकअप झाले आहे. त्याचे काम करून घ्या नाहीतर दंड आकारला जाईल असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप चव्हाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनुराग केळकर (वय 20) यांनी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे एरंडवणे येथील भरतकुंज सोसायटीत राहतात. 22 सप्टेंबर रोजी आरोपी संदीप चव्हाण त्यांच्या घरी आला आणि मी पुणे महानगरपालिकेतून आलो असल्याचे सांगितले. तसेच तुमचे ड्रेनेज चोकअप झाले आहे. त्याचे काम करावे लागेल. नाहीतर पीएमसी कडून दंड आकारला जाईल अशी भीती घातली.

त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून मी साफ करून देतो असे सांगून फिर्यादीच्या आजोबांकडून वेळोवेळी 82 हजार रुपये घेतले. त्याचप्रमाणे आणखी एका व्यक्तीकडून अशाच प्रकारे सतरा हजार पाचशे रुपये घेतले. त्यानंतर काम न करता पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. अलंकार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.