Pune News : भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने 84 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : भागीदारीत भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून त्यातून मिळणारा नफा आपापसात वाटून घेऊ असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 84 लाखांची फसवणूक करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी अविनाश रमेश पासलकर (वय 34) यांनी फिर्याद दिली असून आरोपी आशिष अरुण अरणकल्ले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने ऑगस्ट 2020 मध्ये फिर्यादीला भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवले. शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊ आणि त्याची विक्री करू. त्यातून मिळणारा नफा दोघे वाटून घेऊ असे ठरले होते.

त्यानुसार फिर्यादीने आरोपीला वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यातून व रोख असे 87 लाख रुपये दिले. परंतू व्यवसाय सुरु केलाच नाही. त्यामुळे फिर्यादीने दिलेले पैसे आरोपीकडे परत मागितले. परंतु आरोपीने त्याला फक्त तीन लाख रुपये परत दिले. उर्वरित 84 लाख रुपये परत दिलेच नाहीत.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी अविनाश पासलकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटकही केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.