Chikhali: लॉकडाऊन काळात कामगार पुरविण्याच्या बहाण्याने बनावट सुपरवायझरने कंपनीला घातला लाखाचा गंडा

पैसे मिळाल्यानंतर आरोपीने कंपनीकडे येण्याचे नावच घेतले नाही. फिर्यादी यांनी आरोपीकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात कंपनीतील वेगवेगळ्या साइटवर काम करण्यासाठी कामगार आणण्याच्या बहाण्याने एका नकली सुपरवायझरने कंपनी प्रशासनाला एक लाख रुपयांचा गंडा घातला. यवतमाळ येथून कामगार आणतो म्हणून एक लाख रुपये घेऊन गेलेला सुपरवायझर दीड महिन्यानंतरही न परतल्याने कंपनीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मधुरे इन्फ्रो इंजिनिअरिंग प्रा. लि. रुपीनगर तळवडे येथे 2 मे ते 15 जून या कालावधीत घडला.

योगश धनवडे असे नकली सुपरवायझरचे नाव आहे. त्याच्यासह संजय एस चमेडिया या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अ‍ॅडमिन एक्झिक्युटिव्ह अनंत श्रीरंग केंद्रे (वय 32, रा. मोशी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश हा फिर्यादी काम करत असलेल्या मधुरे इन्फ्रो इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला आला. त्याने सुरुवातीला लॉकडाऊनचे कारण देऊन त्याची कागदपत्रे देण्यास अडचण असल्याचे भासवले.

फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून कंपनीचा फायदा करण्याच्या दृष्टीने काम करू लागला. तसेच कंपनीच्या वेगवेगळ्या साइटवर काम करण्यासाठी लेबर लागतील, अशी त्याने कंपनीकडे मागणी केली.

तसेच यावर त्याने स्वतःच तोडगा काढला. त्याने कंपनीचे संचालक मधुरे यांना सांगितले की, माझ्या ओळखीचे खूप लेबर आहेत. त्यांना आणण्यासाठी मला यवतमाळला जावे लागेल.

आरोपी योगेशच्या नियोजनबद्धतेमुळे कंपनीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि लेबर आणण्यासाठी यवतमाळला जाण्याची परवानगी दिली.

30 ते 40 लेबर आणण्यासाठी त्याने 80 हजार रुपये आणि वाहनाचा खर्च म्हणून 20 हजार रुपये कंपनीकडे मागितले. कंपनीने 80 हजार रुपये अहमदनगर येथील एका बँक खात्यावर आणि वाहतुकीच्या खर्चाचे 20 हजार रुपये यवतमाळ येथील एका बँकेच्या खात्यावर पाठवले.

पैसे मिळाल्यानंतर आरोपीने कंपनीकडे येण्याचे नावच घेतले नाही. फिर्यादी यांनी आरोपीकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

त्यामुळे कंपनीच्या संचालकांचा विश्वास संपादन करून एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचे कंपनीच्या लक्षात आले. याबाबत भारतीय दंड विधान कलम 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.