Pimpri : गर्भवती महिलांना आदित्य बिर्ला रुग्णालयात मिळणार मोफत उपचार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील सर्व रुग्णालयातील गर्भवती महिलांना पुढील उपचारासाठी संत तुकारामनगर येथील ‘वायसीएमएच्’ रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे वायसीएमएच्‌ वरील रुग्णालयीन कामाचा ताण येतो. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात रात्रीच्या वेळी दाखल होणा-या गर्भवती महिलांना आदित्य बिर्ला रुग्णालयात मोफत उपचार दिले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय यांनी दिली.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. महापालिकेच्या शहरातील सर्व रुग्णालये, दवाखान्यातील गर्भवती महिलांना प्रसुतीच्यावेळी उद्भवणा-या अडचणीमुळे पुढील उपाचारासाठी संत तुकारामनगर येथील ‘वायसीएमएच्’ रुग्णालयात पाठविले जाते.  त्यामुळे वायसीएमएच्‌ वर रुग्णालयीन कामाचा ताण येतो. अनेकदा रुग्णालयातील लेबर रुममध्ये जागा उपलब्ध होत नाही. तसेच वायसीएमएच् रुग्णालयामध्ये केमोथेरपी तज्ज्ञ, कॅन्सरचे शल्यचिकित्सक, रेडिओथेरपी तज्ज्ञ उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांची तपासणी व उपचार होण्याच्या दृष्टीने चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाकडून तीन महिन्याकरिता सदर सेवा मोफत पुरविण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

या प्रस्तावाचा विचार करुन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि.16) रोजी महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये दाखल होणा-या स्त्री रुग्णांना रात्रीच्या वेळी प्रसुतीमध्ये अडचण उद्‌भवल्यास असे रुग्ण आदित्य बिर्ला रुग्णालयात पाठविण्यास मान्यता दिली आहे. ही सेवा तीन महिने म्हणजेच 16 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत मोफत असणार आहे. याबाबत आदित्य बिर्ला रुग्णालयाकडून सात दिवसात करारनामा करण्यात येणार आहे.

या सेवेमुळे वायसीएमएच्‌ रुग्णालयातील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच अती जोखमीतील महिला रुग्णांना प्रसुतीच्या वेळी मोफत उपचार मिळतील. तसेच वायसीएमएच्‌मध्ये उपलब्ध नसलेली ‘कॅन्सर’ची सेवा देखील रुग्णांना प्राप्त होईल. याचा रुग्णांना फायदा होईल, असेही डॉ. रॉय यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.