Pune : पुणे परिमंडळातून कोल्हापूर व सांगलीसाठी पथके रवाना

एमपीसी न्यूज –  महापूराच्या संकटामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात विस्कळीत झालेल्या वीज यंत्रणेला पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडळातून साधनसामुग्रीसह अभियंते व कुशल तारमार्ग कर्माचा-यांची पथके कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात रवाना करण्यात आलेली आहे.

पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता  सचिन तालेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात ३ अभियंते व १६ कुशल तारमार्ग कर्मचा-यांची ३ पथके कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आलेली आहेत. तातडीची साधनसामुग्रीची व्यवस्था म्हणून ३१५ के.व्ही क्षमतेचे ३ रोहित्रे, १०० के.व्ही क्षमतेचे ४६ रोहित्रे, १०-४० अम्पीयर थ्री फेजचे ५१६० मिटर तसेच टी अंड पी साधनसामुग्री ७ ट्रकद्वारे आज सकाळी रवाना करण्यात आलेली आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी सर्वतोपरी मदत करण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातून अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामुग्री पुरविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पुणे परिमंडळ येथून यापुढे गरजेनुसार मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक  सुनील पावडे यांनी पूरग्रस्त भागात हल्ली मुक्काम ठोकला असून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे. प्रतिकूल परिस्थितीसोबत मुकाबला करीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न केल्या जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.