Pune : स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग ‘एलिव्हेटेड’ करण्यावर भर असणार -ब्रिजेश दीक्षित

एमपीसी न्यूज : स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्गासाठी सध्या प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र भविष्यात हा मार्ग करताना तो भुयारी करण्यापेक्षा उन्नत (एलिव्हेटेड) करण्यावरच जास्त भर असणार आहे. कारण भुयारी मार्गासाठीचा खर्च आणि देखभालीचा खर्च हा जास्त असल्यामुळे उन्नत मार्ग करणे हेच जास्त फायद्याचे ठरते असे महाराष्ट्र मेट्रो रेल कॅार्पोरेशनचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले.

शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला महामेट्रोतर्फे मेट्रोचे माहीतीकेंद्र १५ ऑगस्टला सुरू करण्यात आले आहे. या माहितीकेंद्राची पाहणी करण्यासाठी दीक्षित आले असताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की सर्व जगभरात भुयारी मेट्रो मार्गापेक्षा उन्नत मार्गच जास्त लोकप्रिय आहे. भुयारी मार्गाला उन्नत मार्गापेक्षा दुप्पट खर्च येतो. आणि एकदा मेट्रो सुरू झाल्यानंतर त्याच्या देखभालीचा खर्चही जास्त करावा लागत असल्याने कात्रज मेट्रोसाठी सगळीकडून भुयारी मार्गाची मागणी असली तरी उन्नत मार्ग हाच चांगला पर्याय असणार आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पांच्या तीन विस्तारीत मार्गांचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. या मार्गांमध्ये कात्रज ते स्वारगेट, पिंपरी-चिंचवड ते निगडी आणि नाशिकफाटा ते चाकण या मार्गांचा समावेश आहे. या मार्ग विस्तारामुळे मेट्रोमार्ग ३२ किलोमीटरवरून ५७ किलोमीटर होणार आहे. दीक्षित यांनी यावेळी सांगितले की, भविष्यात पुणे शहरात जवळजवळ दोनशे कीमीचा मेट्रो मार्ग तयार होणार आहे. मात्र या मार्गाचा विस्तार टप्प्याटप्प्यातच होऊ शकणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.