Pune News : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील फरार ‘पाप्या’ समर्थ पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या सुरज उर्फ पाप्या जाधव (वय 20, रा.कासेवाडी, भवानी पेठ) याला समर्थ पोलिसांनी अटक केली. पाप्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात चोरी आणि इतर असे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना गुप्त बातमीदारांकडून आरोपी पाप्या जाधव हा समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निशांत टॉकीज जवळ उभा असल्याची माहिती मिळाली होती.

याची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते यांनी आरोपीला पकडण्याचा सूचना दिल्या.  त्यानंतर समर्थ पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी आरोपीला पकडण्यासाठी गेले असता पोलिसांना पाहून त्याने पळ काढला. पोलिसांनीही काही अंतर पाठलाग करून पाप्या जाधव याला जेरबंद केले.

पाप्या हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्या विरोधात चोरी आणि इतर असे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. 17 डिसेंबर 2020 रोजी त्याला पुणे पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. असे असताना सुद्धा त्याने पुणे शहरात प्रवेश करून गुन्हेगार आकाश विठ्ठल पाटोळे उर्फ झुरळ्या याच्यासोबत दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे,  पोलीस निरीक्षक उल्हास कदम (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक विशाल मोहिते पोलीस कर्मचारी संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, श्याम सूर्यवंशी, निलेश साबळे, सचिन पवार, विठ्ठल चोरमले, सुमित खुट्टे, सुभाष मोरे, महेश जाधव, विजय कदम यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.