Pimpri News : विकासकामांचा निधी झोपडपट्ट्यांमधील महिलांना चादर, कंबल, संसारपयोगी साहित्य देण्यासाठी

एमपीसी न्यूज – झोपडपट्टीमध्ये वास्तव्य असलेल्या महिलांना चादर, कंबल, पंजा, बेडशीट आणि संसारपयोगी साहित्य देण्याच्या लेखाशीर्षातील तरतुदीत सत्ताधारी भाजपने वाढ केली. 19 कोटी रुपये वाढविण्यात आले आहेत. त्यासाठी बोपखेल येथील मुळा नदीवरील पूल बांधणे, एचसीएमटीआर रस्ता, तळवडे, च-होलीतील रस्ता, सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता व विकास या लेखाशीर्षावरील तरतुदीत उपसुचनेद्वारे घट केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 37 घोषित आणि 34 अघोषित अशा 71 झोपडपट्या आहेत. त्यात 49 हजार 83 झोपड्या असून सुमारे दोन लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. शहरातील घोषित, अघोषित झोपडपट्ट्यांमधील सर्व महिलांना दोन चादर, दोन बॅरेक कंबल, दोन दरी पंजा आणि दोन बेडशीट असा संच देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला होता. पण, तो विषय मागे पडला. महापालिकेच्या 2021-22 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात झोपडपट्टीमध्ये वास्तव्य असलेल्या महिलांना चादर, कंबल, पंजा, बेडशीट आणि संसारपयोगी साहित्य देण्याच्या लेखाशीर्षावर 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

आता  सत्ताधारी भाजपने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध कामांवरील तरतूद वळविली आहे. एचसीएमटीआरच्या राखीव जागा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी डीएमआरसीच्या सल्ल्यानुसार बीआरटी, मोनो, ट्राम यासाठी विकसित करणे, रहाटनी येथे कोकणे चौक ते काळेवाडी फाटा चौकापर्यंत एचसीएमटीआर मार्ग विकसित करणे या कामाच्या वाहतूक सुधारणा विषयक कामे करणे व पार्किंग जागा विकसित करणे या लेखाशिर्षावर 6 कोटी 10 लाख 81 हजार रुपयांची तरतूद होती. त्यातील 3 कोटी रक्कम घट केली आहे. तळवडे येथील शिवेवरील विकास योजनेवरील रस्ता विकसित करण्यासाठी 2 कोटी 29 लाख 5 हजार रुपयांची तरतूद होती. त्यातील 2 कोटी रक्कम घटविली.

च-होली सर्व्हे क्रमांक सात ते महापालिका हद्दीपर्यंचा विकास आराखड्यातील 30 मीटर रस्ता विकसित करण्यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातील 3 कोटी तरतूद घटविली आहे. मोशीतील रस्ते अद्यावत पद्धतीने विकसित करण्यासाठी 7 कोटी रुपयांची तरतूद होती. त्यातील 2 कोटी तरतूद कमी केली आहे. बोपखेल येथे मुळा नदीवर पूल बांधणे  या कामाच्या वाहतूक सुधारणा विषयक कामे करणे व पार्किंग जागा विकसित करणे या लेखाशिर्षावर 17 कोटी 86 लाख 63 हजार रुपयांची तरतूद होती. त्यातील 5 कोटी रुपयांची तरतूद घट केली आहे.

विविध उपक्रमांसाठी असलेल्या 3 कोटी 30 लाख रुपयांच्या तरतुदीतून 2 कोटी घटविले आणि  सर्वांगिक शैक्षणिक गुणवत्ता व विकास या लेखाशीर्षावरील 2 कोटी 20 लाख तरतुदीतून 2 कोटी रक्कम वळविली आहे. अशी एकूण 19 कोटी रुपयांची रक्कम झोपडपट्टीमध्ये वास्तव्य असलेल्या महिलांना चादर, कंबल, पंजा, बेडशीट आणि संसारपयोगी साहित्य देण्याच्या लेखाशीर्षावर वळविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.