Vadgaon Maval News : वडगावात सुसज्ज भाजी मंडई उभारण्यासाठी निधी द्यावा

उपनगराध्यक्षा पूजा वहिले यांची आमदार सुनील शेळके यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे प्रत्येक आठवड्याला बाजार भरतो. या आठवडे बाजारासाठी पंचक्रोशीतील शेतकरी विक्रेते येत असतात. जागेअभावी हे विक्रेते वडगाव मधील रस्त्याच्या बाजूला बसतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच नागरिक व भाजी विक्रेते, व्यापारी यांच्यासाठी सुसज्ज भाजी मंडई उभारण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा पूजा वहिले यांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे केली.

दिलेल्या निवेदनात वहिले यांनी म्हटले आहे की, नगरपंचायत हद्दीत सुमारे 25 ते 30 हजार लोकसंख्या असुन वडगांव शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणी दर बुधवार व मुख्य बाजार गुरुवारी भरतो. वडगांव शहरातून व तालुक्यातून नागरिक, महिला भगिनी बाजारासाठी येतात.

सध्या भरत असलेला आठवडे बाजार व त्यासाठी असलेली मंडईची जागा पुरेशी नाही बरेच  भाजीपाला  विक्रेते हे आतील व मुख्य रस्त्यावर भाजीपाला विक्री करतात त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्नही गंभीर होतो. भाजी विक्रेत्यांस विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या ठिकाणी पंचक्रोशीतील नागरिक व महिला भगिनीनां स्वच्छ ताजा भाजीपाला मिळावा व शेतकरी व भाजी विक्रेत्यांस व नागरिकांस सर्व सुखसोयी युक्त ‘भाजी मंडई’ उभारण्यास भरीव निधी मिळावा अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली.

यावेळी आमदार सुनील शेळके यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही वहिले यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.