Nashik News : नगरसेवकांना हवाय आमदार- खासदारांप्रमाणे निधी, टोल माफी आणि पेन्शन 

नगरसेवक परिषदेचा अजेंडा

एमपीसी न्यूज : आपल्या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी आणि पूर्ततेसाठी शासनावर,  प्रशासनावर दबाव आणण्यासाठी सरपंच परिषदेच्या धर्तीवर राज्यातील आजी माजी नगरसेवक आता ‘नगरसेवक परिषदे’च्या झेंड्याखाली एकत्र झाले आहेत.

नगरसेवक परिषद ही सर्व आजी-माजी नगरसेवकांच्या हक्काचे व्यासपीठ असणार असल्याचा दावा केला जात आहे. मालेगावचे नगरसेवक सुनील गायकवाड परिषदेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष असून नाशिकचे नगरसेवक दिनकर अण्णा पाटील संघटनेचे राज्या उपाध्यक्ष आहेत.

नाशिकमध्ये दि 13 जानेवारी रोजी सातपूर येथील ‘मसाला झोन’ हॉटेल मध्ये या विषयाला फोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात जिल्ह्यातील आजी माजी नगरसेवकांनी बैठकीला उपस्थित राहून आपल्या विविध मागण्या मांडाव्यात अशी अपेक्षा आहे. नगरसेवक परिषदेने तयार केलेल्या आवाहनानुसार प्रमुख मागण्यांमध्ये आमदार खासदारांप्रमाणे निधी, पेन्शन आणि टोल माफी यावर चर्चा झाली. नगरसेवक परिषद ही सर्व आजी माजी नगरसेवकांच्या हितासाठी संघटीतपणे काम करणारी संघटना स्थापन करण्यात आली आहे.

यात एकजुटीने नगरसेवकां साठी शासनाकडे, प्रशासनाकडे  मागण्या मान्य करुन घेण्यासाठी संघटना पक्षविरहीत पणे कार्यरत राहील. यात माजी नगरसेवक देखील सहभागी होऊ शकतात. संघटना आपल्या प्रमुख मागण्या प्रशासनाकडे ठेवणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

१) महाराष्ट्रात नगरसेवकाना सर्व टोल माफ करावेत.

२) लोकप्रतिनिधी म्हणून मंत्रालय तसेच तत्सम शासकीय कार्यालयात विशेष प्रवेश पास द्यावा.

३) मिटींग भत्त्या व्यतिरिक्त मासिक अनुदान ( साधारणतः ५ हजार रु.मासिक किंवा त्यापेक्षा जास्त) किंवा भत्ता इतर खर्चासाठी मिळावा.

४) नगरसेवकांना आमदारांप्रमाणे प्रभागात ठराविक निधी खर्च करण्यासाठी तरतूद करण्यात यावी.

५) आमदार व खासदारांप्रमाणे निवृत्तीवेतन (पेन्शन) हे सुरु करावे.

६) दर सहा महिन्यांत शासकीय योजना व निधी उपलब्ध होण्यासाठीचे लेखाशिर्ष यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यासाठी जिल्हानिहाय प्रशिक्षण आयोजित करावे.

७) नगरसेवकांच्या तक्रारींची गांभिर्याने दखल घेण्यासाठी प्रशासनावर कायदेशीर अंकुश असावा यासाठी नियमावली तयार करावी.

संघटनेने केलेल्या आवाहनानुसार, अनेक विषय हे नगरसेवकांच्या जिव्हाळ्याचे व महत्त्वाचे आहेत जे संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावले जातील. यात सर्वांना एकत्रित आणने व प्रशासनावर दबाव ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता संघटनेत जास्तीत जास्त एकत्रित येणाऱ्यांचे स्वागत आहे. आपल्या व आपल्या स्वकियांच्या हितासाठी संघटीत रहाणे ही काळाची गरज आहे.

सर्व नगरसेवकांना विनंती आहे की, आपण संघटीतपणे आपल्या मागण्या प्रशासनाकडे मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू. सर्वजण एकत्रित आल्यासच हे सहज शक्य आहे, यानिमित्ताने आपण आपली ताकद दाखवू.

संघटनेची पार्श्वभूमी –

नगरसेवक परिषद ही संघटना तीन वर्षांपूर्वी स्थापन झाली. या संघटनेने नगर परिषदा, नगर पालिका, महापालिका, छावणी परिषद या स्थानिक संस्थांमधील नगरसेवकांच्या हक्कासाठी, मागण्यासाठी चळवळ हाती घेतली आहे.

पुण्यातील हिंजेवाडी येथे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राम जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील नगरसेवकांची परिषद घेण्यात आली होती. या परिषदेत महाराष्ट्र राज्य नगरसेवक परिषदेची स्थापना करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष म्हणून पुण्याचे राम जगदाळे – पाटील तर संघटनेचे राज्य उपाध्यक्षपदी नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, सरचिटणीस म्हणून डॉ.कैलास गोरे (पुणे ) यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील सरपंच परिषदे प्रमाणेच राज्यभरातील सर्व नगरसेवकांच्या विविध प्रश्नांवर न्याय मागण्यासाठी संघटन उभे करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हा स्तरावरील पदाधिर्का­यांच्या निवडी करण्यात आल्या असून राज्यातील 30 जिल्हा चे जिल्हाध्यक्ष व 30 जिल्हास्तरावरील महिला आघाडीच्या प्रमुखांची निवड जाहीर करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.