Vadgaon Maval : तळेगाव दाभाडे येथील स्मशानभूमीवरील ताण कमी करण्यासाठी आता वडगाव मावळ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज : कोरोनाने मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेवर प्रथमच वडगाव मावळ येथील वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी (दि.२१) सकाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमाचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी दिली.

नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा ताण तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीवर पडत असल्याने तसेच अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी पीपीई किट तसेच परिसर सॅनिटायझर करुन सामाजिक अंतर ठेवत पहिल्यांदाच वैकुंठ स्मशानभूमीत एका ज्येष्ठ महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मावळ तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत जावे लागते. या स्मशानभूमीत मावळ तालुक्यातील लोणावळा, वडगाव, तळेगाव दाभाडे व देहूरोड तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील मृतदेहाचा अंत्यसंस्कार होतो.

मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नंबर लावावा लागत असुन मृतदेह शितगृहात ठेवण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे. तसेच दुःखात असलेल्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्याची चिंता सतावते. मृतदेहावर वेळेत अंत्यसंस्कार होण्यासाठी तसेच नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी स्वतः पीपीई किट घालून कोरोनाने मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचा प्रथमच अंत्यसंस्कार केला.

वडगाव नगरपंचायत हद्दीतील गॅस शव दाहीनीचे काम प्रगतीपथावर असुन लवकरच सुरु करण्यात येत आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यावर परिसराची सॅनिटायझरने फवारणी केली आहे. मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील कोरोनाच्या मृतदेहावर वडगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.