Fursungi News: कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करा, अन्यथा 15 ऑगस्ट पासून आंदोलन 

उरुळी देवाची, फुरसुंगी ग्रामस्थांचा इशारा

एमपीसी न्यूज – उरुळी देवाची – फुरसुंगी येथील पुणे महापालिकेचा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करा, अन्यथा 15 ऑगस्ट पासून आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.

राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेला वारंवार सूचना देऊनही महापालिकेतर्फे घनकचरा हाताळणी नियम 2016 चे पालन केले जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी मागणी कचरा डेपो संघर्ष समितीचे रणजित रासकर, गणेश ढोरे, दिलीप मेहता, विजय भाडळे, भगवान भाडळे, संजय हरपळे, तात्यासाहेब भाडळे, बाळासाहेब हरपळे यांनी केली आहे.

उरुळी देवाची – फुरसुंगी येथील कचरा डेपो बंद करणे बाबत बैठकीतील घेतलेल्या निर्णयाचे पालन महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करीत नाहीत. आंदोलन स्थगित केल्या नंतर पुन्हा शहरात दैनंदिन निर्माण होणारा मिश्र कचरा डेपोवर ओपन डम्पिंग केला जातो. शहरतील विविध प्रक्रिया प्रकल्पातून आणि बायोमायनिंग निघणारे रिजेक्ट देखील कचरा डेपोवर ओपन डम्पिंग केले जात आहे. बायोमायनिंग प्रकल्प हा जुन्या साठलेल्या काचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी असताना तिथे नवीन मिश्र कचरा घेतला जात आहे.

शहरातील राडारोडा कचरा व रिजेक्टवर झाकून टाकण्यासाठी आणला जात आहे. तसेच नवीन प्रकल्पाला विरोध असताना प्रकल्प नागरिकांच्या माथ्यावर मारण्याचे काम केले जात आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.