Pune : सीप आयोजित पुणे कनेक्ट परिषदेत फ्यूचर इन द कनेक्टेड वर्ल्ड संकल्पना

एमपीसी न्यूज – पुण्यातील ‘सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे’ अर्थात ‘सीप’ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ‘पुणे कनेक्ट’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे हे आठवे वर्ष असून येत्या शनिवारी (दि. १४) नगर रस्त्यावरील हॉटेल हयात रिजन्सी येथे ही परिषद पार पडणार आहे.

सीपच्या कार्यकारी समितीचे सदस्य व पुणे कनेक्टचे प्रमुख अभिजित अत्रे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सीपचे अध्यक्ष अश्विन मेघा, उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे आणि पुणे कनेक्टचे कार्यक्रम संचालक स्वप्नील देशपांडे यावेळी उपस्थित होते.

सध्या जग झपाट्याने बदलत चालले असून तंत्रज्ञान हा जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. ‘फ्यूचर इन द कनेक्टेड वर्ल्ड’ अर्थात रोज बदलणा-या तंत्रज्ञानाशी जुळवून कसे घ्यावे आणि एकमेकाशी जोडल्या गेलेल्या जगात सामर्थ्याने उभे राहून यश कसे प्राप्त करावे, ही या वर्षीच्या पुणे कनेक्टची मध्यवर्ती संकल्पना आहे. ‘‘माहिती तंत्रज्ञानातील तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांबरोबरच या विषयातील नवे संशोधन आणि होणा-या बदलांसाठी मनुष्यबळास प्रशिक्षित कसे करावे, याविषयीही या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे,’’ असे अत्रे यांनी या वेळी सांगितले.

गेल्या ८ वर्षांत ७७६ स्टार्ट अप कंपन्यांकडून पुणे कनेक्टमध्ये सहभागासाठी अर्ज प्राप्त झाले होते. यातील निवडक अशा २५८ स्टार्ट अप कंपन्यांना प्रत्यक्ष या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली उत्पादने आणि सेवा लोकांसमोर आणण्याची संधी मिळाली. या वर्षी ७५ स्टार्ट अप कंपन्यांकडून संस्थेकडे अर्ज आले असून त्यातील निवडक ३४ स्टार्ट अप संस्थापकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यातून २० जणांना पुणे कनेक्टमध्ये सादरीकरण करण्यासाठी निवडण्यात आले आहे. नवीन उद्योजकांना अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे आणि व्यवसायाविषयीची त्यांची समज आणखी वाढावी असा याचा उद्देश आहे.

पुणे कनेक्ट या उपक्रमाविषयी माहिती देताना अश्विन मेघा म्हणाले, ‘‘माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुण्याने देशात आपले महत्त्वाचे स्थान कायम राखले आहे. विशेषतः ‘स्टार्ट अप’ संस्कृतीला चालना देण्यासाठी पुण्यातील माहिती तंत्रज्ञानात क्षेत्राने नेहमी पुढाकार घेतला आहे. ‘स्टार्ट अप’साठी शहरात आणखी पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि नवनवीन कल्पनांना यशस्वी व्यवसायाचे मूर्त स्वरूप मिळावे या प्रमुख उद्देशाने ‘सीप’तर्फे २०११ मध्ये ‘पुणे कनेक्ट’ या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.’’

‘‘या वर्षीच्या पुणे कनेक्टची मध्यवर्ती संकल्पना आजच्या काळाशी अत्यंत सुसंगत असून माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित प्रत्येकाला या परिषदेत निश्चितपणे काहीतरी नवीन जाणून घेण्याची संधी मिळेल. सर्वोत्कृष्ट ५ स्टार्ट अप्सना कार्यक्रमाच्या मुख्य समारंभात आपल्या नवकल्पना मांडता येणार आहेत. तज्ञांसमोर केलेल्या सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांना व्यवसायासाठी गुंतवणूक मिळवणे सोपे जाईल. अंतिमतः यातील ३ स्टार्ट अप्सना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून ‘डिजिटल ओशन’च्या ‘हॅच प्रोग्रॅम’ या विशेष उपक्रमात त्यांना सहभागी होता येणार आहे.’’, असेही अश्विन मेघा यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या ‘एसटीपीआय’ (सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस् ऑफ इंडिया) विभागाचे महासंचालक डॉ. ओंकार राय यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय सिस्कोचे भारत व सार्क देशांमधील अध्यक्ष समीर गद्रे, तंत्रज्ञानातील सल्लागार जसप्रीत बिंद्रा, डिजिटल फिफ्थचे प्रमुख कार्यकारी अधिकारी समीर सिंग जैनी, बोईंगच्या ग्लोबल टेक्निकल लीडर सीमा चोप्रा, सिटीच्या उपाध्यक्ष करडखेडकर, टेडएक्स व्याख्याते राजा जमालामडाका, टेक महिंद्राच्या एंटरप्राईज बिझनेस सोल्यूशन्स अँड अलायन्सेस विभागाचे जागतिक प्रमुख कृष्णा गोपाळ, रँडस्टॅड इंडियाच्या चीफ पीपल ऑफिसर अंजली रघुवंशी यांच्यासह अनेक तज्ञांची व्याख्याने परिषदेत ऐकायला मिळणार आहेत.

परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरणाच्या समारंभासाठी प्रख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी उपस्थित राहणार असून इनोव्हेशन इन रिदम या विषयावरील त्यांचे सादरीकरण हा परिषदेतील एक आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या आणि पुन्हा धीराने उभ्या राहिलेल्या अनमोल रॉड्रिग्स यांच्याशी प्रेरणादायक गप्पांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

‘पुणे कनेक्ट’ या उपक्रमामध्ये जागतिक संशोधन केंद्रे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा देणाऱ्या कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था, उत्पादक, सेमी कंडक्टर आणि दूरसंचार क्षेत्रातील अभियांत्रिकी संशोधन व विकास केंद्रे यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो.

‘पुणे कनेक्ट २०१९’ या उपक्रमासंदर्भात अधिक माहिती www.puneconnect.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक असून त्यासाठी इच्छुकांनी वरील संकेत स्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन सीपच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.