FYJC Admission : अकरावी प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी मुदतवाढ, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

एमपीसी न्यूज – राज्यात मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या पाच महानगर क्षेत्रात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी 21 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. कोणीही प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. असे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

वरील महानगरपालिका क्षेत्रांमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रवेश फेरी सध्या सुरु आहे. यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार दि.18 ऑक्टोबर 2021 रोजी फेरी समाप्त होत आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, काही विद्यार्थ्यांना आपला प्रवेश रद्द करावयाचा आहे, तसेच काही विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत. दरम्यानच्या काळामध्ये काही सुट्टया आलेल्या आहेत. त्यामुळे कोणीही प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी यापुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

या फेरीअंतर्गत दि. 21/10/2021 रोजी दु.12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. अलॉटमेंट नंतर दि.21 रोजी सायं. 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. वाढीव कालावधीमध्ये दहावी उत्तीर्ण असलेले सर्व तसेच एटिकेटी विद्यार्थी पात्र असतील. दिलेल्या वाढीव वेळेमध्ये उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावेत, यानुसार संबंधित विद्यालयांमार्फत आवश्यक सूचना दर्शनी भागात लावण्यात येतील. इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याचे अकरावी प्रवेशाबाबत पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर निर्णय घेण्यात येईल.

काही शिक्षण मंडळाच्या गुणपत्रिकेवर तेथील शासन आदेशानुसार विषयांसमोर केवळ पास असे नमूद आहे. आता एफसीएफसी फेरी सुरू असल्याने सर्व उत्तीर्ण तसेच एटिकेटी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी दिली जात आहे. त्यामुळे गुणपत्रिकेवर गुण अथवा श्रेणीही नमूद नसून केवळ पास असे नमूद असेल तर अशा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण साठी किमान गुण (35 % प्रमाणे एकूण गुण गृहीत धरून) ऑनलाईन अर्ज भरावेत, अशा विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये सहभागी होता येईल.

अकरावी मध्ये प्रवेश मिळण्यासाठी दहावी मध्ये इंग्रजी विषय पास असणे आवश्यक आहे. तसेच विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी दहावी मध्ये विज्ञान विषय पास असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे अकरावी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता तपासल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांना दहावी मध्ये एटिकेटी सवलत मिळालेली आहे, त्यांना अकरावी प्रवेशासाठी (इंग्रजी विषयात एटिकेटी असेल तरीही) अर्ज भरता येतील. या विद्यार्थ्यांना भविष्यात इंग्रजी विषय उत्तीर्ण होणे आवश्यक असेल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक व.गो. जगताप यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.