Atpadi News : ‘गदिमा महोत्सव’ 17 जानेवारीला ; माडगूळे येथे महोत्सवाचे आयोजन 

एमपीसी न्यूजसाहित्यिक .दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त होणारा यंदाचा 28 वा गदिमा काव्य महोत्सव 17 जानेवारीला होणार आहे. माडगूळकर यांच्या गावी म्हणजेच आटपाडी तालुक्यातील माडगूळे येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.   

नारायण सुर्वे कला अकादमी, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आटपाडी शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा व माडगुळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव घेतला जाणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आटपाडी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला.

या बैठकीला गदिमा महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद आटपाडी शाखेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, कार्यवाह प्रा. दिगंबर ढोकळे, प्रसिद्ध कवी राजेंद्र वाघ, प्रा. विश्वनाथ जाधव, मुक्तेश्वर माडगूळकर, सरपंच संजय विभुते, प्रा. हेमंत कुलकर्णी, वसंत पाटील, गदिमा हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.ए पाटील, सुरेश गायकवाड, प्रा.नारायण आदलिंगे, ज्येष्ठ साहित्यप्रेमी सादिक खाटीक, कवी प्रा. विजय शिंदे, दिनेश देशमुख, कवी सुनील जवंजाळ, मुकुंद वलेकर, महादेव मंडले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवात गदिमा वारसदार कवी, महाराष्ट्रातील सहा कवितासंग्रहांना पुरस्कार, गदिमा जीवन गौरव पुरस्कार, शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृत्युंजय साहित्य पुरस्कार, गदिमा लोककलावंत पुरस्कार व गदिमा जन्मशताब्दी सांस्कृतिक पुरस्कार आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यावेळी बोलताना म्हणाले, यंदाचा गदिमा महोत्सव हा माडगूळकरांच्या गावी होत असल्याने आम्हा सर्व साहित्यिकांना प्रचंड आनंद होत आहे. गेली सत्तावीस वर्ष हा महोत्सव आयोजित केला जात आहे. या वर्षीचा महोत्सव अतिशय नाविन्यपूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी गदिमा महोत्सवात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली. माणदेशातील साहित्यप्रेमी व माडगुळे ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा संकल्प त्यांनी केला.

साहित्यप्रेमी सादिक खाटीक म्हणाले, माणदेशातील साहित्य विश्वाचे नेतृत्व माडगूळे केंद्रस्थानी ठेवून माडगूळकर परिवाराचे वतीने गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी करावे. अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पाच अध्यक्ष देण्याऱ्या आटपाडी तालुक्यात अ.भा मराठी साहित्य संमेलन व्हावे यासाठी भविष्यात मोठे प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा  त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गदिमा महोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याबाबत मुरलीधर साठे, प्रा. विश्वनाथ जाधव, सादिक खाटीक यांनी विविध संकल्पना मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे कार्यवाहक दिगंबर ढोकळे यांनी केले. प्रा. विजय शिंदे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.