Gahunje News : मामुर्डी ते साईनगर-गहुंजे वनराईतील कचऱ्यामुळे आरोग्यास धोका

एमपीसी न्यूज – मामुर्डी ते साईनगर गहुंजे या वन विभागामधून जाणाऱ्या निसर्गरम्य परिसरातून रोडच्या कडेला प्रचंड सुका कचरा, राडारोडा व प्लास्टिक कचरा साचल्याने या परिसरात राहणार्‍या स्थानिक रहिवासी आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण सर्वात जास्त दिसून येते. या पिशव्या वाऱ्यामुळे उडून इतरत्र जातात. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.

प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये टाकण्यात येणारे खाद्यपदार्थ मोकाट जनावरांना खाणे शक्य होत नाही. या कचर्‍यामुळे सध्या अनेक साथीच्या व संसर्ग जन्य आजारामुळे अनेक नागरिकांना डेंग्यू, मलेरिया या आजारांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरुन रोज येणार्‍या – जाणार्‍या कामगार वर्ग व प्रवाशांना या कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. या कचर्‍यामुळे अन्नाच्या शोधात फिरणारी अनेक मोकाट भटकी कुत्री या परिसरात येत असतात. अनेक वेळा ती मोकाट भटक्या कुत्री पायी जाणार्‍या नागरिक व प्रवाशांवर चावा घेण्यासाठी अंगावर धावुनही जातात. या कुत्र्यांच्या रोडवरील भांडणामुळे दुचाकीवरचे अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

हा परिसर घाणीचे साम्राज्य बनत चालला असून डेंगी रोगाला पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे तसेच कोरोना सारखे साथीचे संकट असतानाही हा कचरा रोडवर टाकण्याचे काम सुरूच आहे. ‘मामुर्डी ते साईनगर गहुंजे दरम्यान वनराईतून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पालिकेच्या ‘ब’ प्रभाग आरोग्य विभागाने त्वरित स्वच्छता करावी,’ अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अमरसिंग हिरे व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.