Vadgaon Maval : गजा मारणे कोर्टात आला, त्याला जामीन मिळाला आणि तो निघूनही गेला

एमपीसी न्यूज – तळोजा कारागृह ते पुणे या मार्गावर रॅली काढून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुंड गजानन मारणे आणि साथीदारांवर शिरगाव पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला. त्यानंतर मारणे अद्याप पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मात्र गुरुवारी (दि. 25) मारणे त्याच्या वकिलांसह वडगाव मावळ न्यायालयात हजर झाला. न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला. त्यानंतर मारणे निघूनही गेला. या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसांची मात्र चांगलीच पंचाईत झाली.

_MPC_DIR_MPU_II

तुरूंगातून सुटल्यानंतर गुंड गजानन मारणे याची तळोजा (नवी मुंबई) ते पुणे या मार्गावरून रॅली काढण्यात आली. याबाबत पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरू झाले. शिरगाव, कोथरूड, हिंजवडी, वारजे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान कोथरूड पोलिसांनी मारणे आणि त्याच्या नऊ साथीदारांना अटक केली. त्यात त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला.

त्यानंतर मारणे अटकेच्या भीतीने पळून गेल्याचे सांगितले जाते. शिरगाव पोलिसांची अनेक पथके त्याच्या मागावर असून त्याच्या अनेक साथीदारांना शिरगाव पोलिसांनी पकडले आहे. अनेक महागड्या कार देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र मारणे पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

कोथरूड येथील गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस ताबा घ्यायला आले होते. परंतु कोर्टाने ताबा नाकारला होता. मारणे याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी फरार घोषित केले होते. पण गुरुवारी स्वतः आरोपी गजानन मारणे त्याच्या वकिलांसह कोर्टात हजर झाला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने त्याचा 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

गजानन मारणे तर्फे अॅड विपुल दुशिंग, अॅड सौरभ दाभाडे, अॅड अक्षय बडवे यांनी काम पाहिले. अॅड वाळके यांनी सरकारची बाजू मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.