Pimpri : सहा वर्षापासून फरार असलेला आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज  – खून, जबरी चोरीच्या गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी दरोडा विरोधी पथकाने गजाआड केले. ही कारवाई आज (शनिवारी) करण्यात आली.

सोन्या उर्फ जालिंदर नारायण नलावडे (वय 26, रा. माल्कुप, ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आळंदी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सोन्या हा अहमदनगर येथे राहण्यास असून तो भाळवणीगावात बिगारी  कामाकरिता येत असल्याची माहिती मिळाली. पोलीस कर्मचारी किरण काटकर व आशिष बोटके यांना त्यांच्या खब-याकडून ही माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे आळंदीतील गुन्ह्याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याला पोलीस आयुक्तालयात आणले. आळंदी पोलीस ठाण्यात खात्री केली असता तो सहा वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली आहे. चाकण येथील गुन्ह्यात देखील तो सहा वर्षापासून फरार होता. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात तब्बल 20 गुन्हे आणि देहूरोड पोलीस ठाण्यात एक असे 21 गुन्हे दाखल आहेत.

खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी किरण काटकर, आशिष बोटके, निशांत काळे, सागर शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.