Hinjawadi News : गजानन मारणे आणि साथीदारांवर मागील तीन दिवसात तिसरा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  दोन खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढली. याचे ड्रेनद्वारे शूटिंग केले. त्यानंतर कोथरूड परिसरात गणेश जयंतीच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. पुणे-बेंगलोर महामार्गावरून जाताना अन्य वाहन चालकांना वाहतुकीस अडथळा निर्माण करून त्यांना शिवीगाळ केली. याबाबत पहिला गुन्हा शिरगाव चौकीत दाखल करण्यात आला. त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात दुसरा तर आता हिंजवडी पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात कुख्यात गुंड गजानन मारणे याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सोमवारी (दि. 15) सायंकाळी त्याला नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी तळोजा कारागृहाच्या बाहेर तोबा गर्दी केली. तळोजा कारागृहापासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यापर्यंत शेकडो गाड्यांच्या ताफ्यात त्याची जणू मिरवणूक काढण्यात आली.

जेलमधून सुटून आल्याने मारणे याच्या साथीदारांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने बेकायदेशीर जमाव जमवला. तिथे फटाके वाजवून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. या संपूर्ण प्रकाराचे ड्रोन कॅमे-याच्या साहाय्याने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. याबाबत गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात शिरगाव पोलीस चौकीत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याचा ड्रोन देखील जप्त केला.

त्यानंतर गणेश जयंती निमित्त कोथरूड परिसरात एका सार्वजनिक कार्यक्रमात मारणे आणि त्याच्या साथीदारांनी हजेरी लावली. तिथे कोरोनाच्या नियमांचे पालन न करता तसेच दहशतीचे वातावरण निर्माण केले. याबाबत कोथरूड पोलिसांनी देखील गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला. कोथरूड पोलिसांनी मारणे आणि त्याच्या काही साथीदारांना मंगळवारी (दि. 16) अटकही केली. बुधवारी त्याची जामिनावर सुटका झाली.

त्यानंतर बुधवारी रात्री हिंजवडी पोलीस ठाण्यात गजानन मारणे आणि त्याच्या 100 ते 150 साथीदारांवर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारणे याने पुणे-बेंगलोर महामार्गावरून 100 ते 150 साथीदारांसह दहशतीचे वातावरण निर्माण केले. गाडीच्या प्लॅटफॉर्मवर धोकादायक पद्धतीने उभा राहून गाड्यांमधून अर्धवट शरीर बाहेर काढून, अन्य गाड्यांना थांबवून शिवीगाळ करून दहशत निर्माण केली.

पोलिसांनी या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता मारणे याच्या ताफ्यातील गाड्या न थांबता निघून गेल्या. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गजानन मारणे याला सन 2014 साली दोन खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली. त्यानंतर त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला त्याला येरवडा येथील कारागृहात ठेवण्यात आले. काही कालावधीनंतर त्याला कोल्हापूर येथे हलवण्यात आले. तिथून काही दिवसांपूर्वी त्याला नवी मुंबई येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.

दरम्यान दोन्ही खून प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजता मारणे कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर त्याच्या मागे आणि पुढे शेकडो गाड्यांचा ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झाला. ‘महाराष्ट्राचा किंग’ असे स्टेटस ठेऊन त्याच्या समर्थकांनी त्याचे स्वागत केले. जेलमधून बाहेर आल्यानंतर तीन दिवसात मारणे आणि साथीदारांवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.