Chinchwad News : पोलीस आयुक्तांच्या सज्जड दमानंतरही शहरात जुगार अड्डे जोमात; वर्षभरात 285 जुगार अड्ड्यांवर छापे

एमपीसी न्यूज – जुगार, मटका, दारूविक्री असे अवैध धंदे करणा-यांना पोलीस आयुक्तांनी शहरात आल्यानंतर पहिल्याच दिवशी दम भरला. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना केली. त्याद्वारे आयुक्तांनी शहरात अवैध धंद्यांवर कारवाईला सुरुवात केली. स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभाग, अंमली पदार्थ विरोधी पथक अशा सर्व पथकांच्या माध्यमातून अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली. तरीही शहरातील अवैध धंदे संपण्याचे नाव घेत नाहीत. जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षभरात तब्बल 285 जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारले आहेत.

सप्टेंबर महिन्यात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्त पदाची धुरा हाती घेतली. त्यानंतर त्यांनी लगेच गुन्हेगार, अवैध धंदे चालकांना सज्जड दम देत ‘मी शहरात असेपर्यंत दुसरे धंदे शोधा’ असा सल्ला दिला. पोलीस ठाण्याच्या गडकऱ्यांना अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पहिल्याच बैठकीत दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाला बहुतांश अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आणि शहरातील अवैध धंदे जोमात सुरू राहीले.

पोलीस आयुक्तांच्या ही बाब निदर्शनास न येईल तोच नवल. आपण आदेश देऊनही शहरात अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी अवैध धंद्यांवर वचक निर्माण करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना केली. स्थानिक पोलिसांच्या अगोदर सामाजिक सुरक्षा विभागाला अवैध धंद्यांची माहिती मिळू लागली आणि त्यावरील कारवाईला वेग आला.

आपल्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांची माहिती अपल्या अगोदार सामाजिक सुरक्षा विभागाला मिळत असल्याने स्थानिक पोलिसांनी देखील कंबर कसली आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले. सन 2019 साली 237 जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारले. त्यानंतर हे प्रमाण वाढून 254 एवढे झाले. त्यात आणखी वाढ होऊन मागील वर्षी 285 जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारले आहेत. ऑगस्ट आणि नोव्हेंबर वगळता प्रत्येक महिन्यात 20 पेक्षा अधिक जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई झाली आहे. दररोज पडणारे छापे, एकदा कारवाई होऊनही न सुधारणारे नागरिक यामुळे शहराच्या प्रतिमेला डाग लागत आहे. हा डाग पुसण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

वर्षभरात पोलिसांनी केलेली कारवाई –
जानेवारी – 25
फेब्रुवारी – 36
मार्च – 36
एप्रिल – 24
मे – 20
जून – 21
जुलै – 23
ऑगस्ट – 15
सप्टेंबर – 27
ऑक्टोबर – 20
नोव्हेंबर – 18
डिसेंबर – 20

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.