Pimpri : आदर्श उत्सवाचा नमुना मांडणारा ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचा गणेशोत्सव

एमपीसी न्यूज – सध्या गणेशोत्सवाला खूपच वेगळे वळण मिळाले असून त्याच्या सद्य स्वरुपाने विचारी नागरिक खूपच अस्वस्थ होत आहे. मात्र आदर्श उत्सवाचा नमुना आपल्यालाच समाजापुढे ठेवावा लागणार आहे. आणि आदर्श कौटुंबिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव कसा असू शकतो याचा नमुना समाजासमोर ठेवावा या उद्देशाने निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने यंदा आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.  कौटुंबिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव कशा पद्धतीने सक्षम करता येईल याविषयी चिंतन करुन यंदाचा गणेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 

केवळ परंपरा जपण्यापेक्षा अधक सजगपणे, सर्वांच्या सहभागाने आणि उत्साही वातावरणात गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी त्याआधी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सजावट, मोदक तयार करणे, निर्माल्यापासून खत निर्मिती यांचा समावेश होता. स्वयं पौरोहित्य, घरगुती प्रसाद, घरगुती सजावट यावर विशेष भर दिला होता. सामूहिक व घरचा गणेशोत्सव सक्षम होण्यासाठी विद्यार्थी व पालक यांच्यात सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी हा प्रयत्न होता. विद्यालय यंदा स्वच्छता वर्ष साजरे करीत आहे. त्यामुळे गणेशोत्सवात देखील या संकल्पनेचा अंतर्भाव होता. पर्यावरणपूरक आदर्श गणेशोत्सव कसा असाव याविषयी विद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्या मनात जरी जागृती झाली तरी पर्यायाने ती 2300 कुटुंबांमध्ये होईल हा या मागील स्तुत्य असा विचार आहे.

यानिमित्त सांस्कृत्क कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी(१८ सप्टेंबर) विरासत – एक परंपरा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार-कुलकर्णी यांनी सुश्राव्य गायन सादर केले. यावेळी त्यांनी पं. भास्करबुवा बखले यांची गणपती वंदना असलेली खास बंदिश, संगीत मानापमान नाटकातील शूरा मी वंदिले व संगीत कुलवधू या नाटकातील क्षण आला भाग्याचा ही नाट्यपदे, संत रामदास रचित व श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ताने स्वर रंगवावा ही रचना, माणूस चित्रपटातील कशाला उद्याची बात हे पद, विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेले हसले मनी चांदणे हे गीत सादर केले. संत कान्होपात्रा यांच्या अगा वैकुंठीच्या राया या भैरवीने या संगीत मैफिलीची सांगता करण्यात आली. यावेळी समीर पुणतांबेकर यांनी तबलासाथ, दीप्ती कुलकर्णी यांनी संवादिनीसाथव अमृता ठाकूरदेसाई यांनी सिंथेसायझरची साथ केली. सुगम, उपशास्त्रीय आणि भक्तीरचनांनी सजलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी पसंतीची उत्स्फूर्त दाद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.